मनेका गांधींच्या वक्तव्यावर टीका
समाजामध्ये होणारी हिंसा ही कोणत्याही प्रकारची असो, पुरुषांकडून होत असेल किंवा महिलांकडून, ती समाजाच्या दृष्टीने वाईटच आहे. गृह विभाग पुरुषी हिंसा किंवा महिलांनी केलेली हिंसा असा भेदभाव करणार नाही, असे सांगून केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांच्या वक्तव्यावर टीका केली.
राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने किरण रिजीजू नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांचा सुवर्णपदक देऊन यावेळी गौरव करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी हिंसा पुरुषच करतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना किरण रिजीजू म्हणाले, हिंसा ही कोणत्याही प्रकारची असो, ती महिलांच्या विरोधात असो की पुरुषांच्या विरोधात, ती थांबली पाहिजे. गृह विभाग कोणाकडून करण्यात आलेल्या हिसेंचे समर्थन आणि भेदभाव करीत नाही. हत्या करणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे मग तो पुरुष असो की महिला. मनेका गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या असून त्यांनी केलेले विधान वैयक्तिक असले तरी त्यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे रिजीजू म्हणाले. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्र संधीचे उल्लंघन करून केल्या जाणाऱ्या गोळाबीराला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, भारत स्वतहून कधीच शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत नाही. पाकिस्तानने नुकतेच दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरलेल्या मुद्दय़ांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बिहार निवडणुकीच्या संदर्भात बोलताना रिजीजू म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल असे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास असल्यामुळे जनता भाजपला संधी देईल.