महेश बोकडे

प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन औषध दुकानातून विक्रीवर बंदी घातल्याने  खाटेअभावी गृह विलगीकरणात उपचारास बाध्य गंभीर  रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

नागपूर जिल्ह््यातील करोना स्थिती गंभीर वळणावर आहे. येथे रोज ६ ते ७ हजार नवीन  रुग्णांची भर पडत असून त्यात गंभीर संवर्गातील अनेक रुग्णांचा समावेश आहे.  वैद्यकीय तज्ज्ञांच्या निकषानुसार वृद्ध, उच्च रक्तदाबासह इतर सहआजार असलेला रुग्ण जोखमीत मोडतो. त्यांना करोना झाल्यास त्यांचा एचआरसीटी गुणांक थोडा कमी असला तरी रेमडेसिवीर द्यावे लागते. अशा स्थितीत रुग्णालयांत जागा मिळत नसल्याने काही गंभीर रुग्णांनी घरातच  उपचार सुरू केला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, या रुग्णांना रेमडेसिवीरची गरज आहे. परंतु प्रशासनाच्या निर्णयामुळे या  गृह विलगीकरणातील गंभीर रुग्णांना औषध दुकानात हे इंजेक्शन मिळणे बंद झाले आहे. या प्रकाराने मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका वर्तवला आहे.

शासकीय कार्यालयातून वाटप करा

माझे स्वत:चे औषध दुकान आहे. परंतु, निवडक दुकानांनाच प्रशासनाने रेमडेसिवीर विक्रीची परवानगी दिली आहे. जिल्ह््यात रोज सुमारे साडेचार हजार इंजेक्शनची गरज असतांना त्याहून खूप कमी इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने माझ्या नातेवाईकांनाही मध्येच हे इंजेक्शन देणे बंद करावे लागले. प्रशासनाने रुग्णालयांऐवजी शासकीय कार्यालयातून रेमडेसिवीर उपलब्ध केल्यास रुग्णांना लाभ शक्य असल्याचे एका औषध दुकानदाराने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.

* प्रशासनाने आता थेट कोविड रुग्णालयांनाच रेमडेसिवीरचा पुरवठा करणे सुरू केले आहे. रुग्ण कोविड डे केअरमध्येही असल्यास तेथेही रेमडेसिवीर मिळू शकते. परंतु, गृहविलगीकरणातील रुग्णांबाबत मला काही बोलता येणार नाही, असे मत रेमडेसिवीर पुरवठा सनियंत्रण समितीचे अधिकारी असलेले शेखर गाडगे यांनी सांगितले.

‘‘माझ्या जवळच्या दोन रुग्णांचा ‘एचआरसीटी’ तपासणीचा गुणांक जास्त आला होता. त्यांना रुग्णालयांत जागा न मिळाल्याने जवळच्या डॉक्टरच्या मदतीने घरात रेमडेसिवीर सुरू केले. परंतु औषध दुकानात ते मिळणे बंद झाल्याने शेवटी या इंजेक्शनचा कोर्स पूर्ण न करता बंद करावा लागला. इतकी वाईट अवस्था असतानाही नागपूरचे पालकमंत्री निद्रावस्थेत आहेत.’’

– त्रिशरण सहारे, एक नागरिक.