समांतर शेअर बाजार असलेल्या अनधिकृत डब्बा व्यापाराकरिता ‘सौदा’ सॉफ्टवेअर वापरण्यात येते. मात्र, एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने नागपुरातील डब्बा व्यापाऱ्यांना या सॉफ्टवेअरचा पुरवठा केला. विशेष म्हणजे, डब्बा व्यापाऱ्यांनी संबंधिताचे नाव पोलिसांना सांगितले, परंतु पोलिसांनी त्याची साधी चौकशीही केली नसल्याची बाब समोर येत आहे.

गेल्या १२ मे रोजी गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील शहरातील दहा प्रतिष्ठानांवर छापे टाकले होते. यात पोलिसांनी रमेश छोटेलाल पात्रे (३३, रा. १०१, वैशालीनगर), गोविंद भंवरलाल सारडा (४२, रा. कॅनाल रोड), कुशल किशोर लद्दड (३७, रा. रामदासपेठ), वीणा घनश्याम सारडा (५१, रा. शिवाजीनगर), प्रितेश सुरेशकुमार लखोटिया (३७, रा. २०१, शंकरनगर), अश्वीन मधुकर बोरीकर (३०, रा. दुर्गावतीनगर), विकास लक्ष्मीनारायण कुबडे (२८, रा. पाचपावली), स्वप्नील विजयराव पराते (२४, रा. शिवाजीनगर), विजय चंदुलाल गोकलानी (३४, रा. क्वेटा कॉलनी), निरज ओमप्रकाश अग्रवाल आणि निमीत किरीट मेहता, रवी ओमप्रकाश अग्रवाल, दिनेश भंवरलाल सारडा रा. कॅनाल रोड, विनय श्रीप्रकाश अग्रवाल (३१, रा. एलीमेंटस अपार्टमेंट, सूर्यनगर), अंकित ओमप्रकाश मालू (२५, रा. वाठोडा, नंदनवन), आशीष मुकुंद बजाज (३७, रा. हिवरीनगर), अभिषेक मुकुंद बजाज (३४, रा. हिवरीनगर), कन्हैय्या उर्फ कन्नी रामचंद्र थावराणी आणि सचिन ठाकुरलाल अग्रवाल (३७, रा. सतनामीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले. या प्रकरणात जवळपास अकरा आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या ते आरोपी जामिनावर सुटले आहेत. तर रवी अग्रवालसह अनेक आरोपी आजही फरार आहेत.

या प्रकरणात अनेक बडे मासे गुंतलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जप्त करण्यात आलेले संगणक आणि हार्डडिस्क मधील माहितीचा उलगडा झाल्याशिवाय कुणाचीच नावे सांगता येणार नाही असे पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, अटक केलेल्या आरोपींनी त्यांनी डब्बा व्यापाराकरिता आवश्यक ‘सौदा’ नावाचे सॉफ्टवेअर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाकडून खरेदी केल्याची माहिती दिली.

परंतु पोलिसांनी संबंधिताची साधी चौकशीही केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रष्टद्धr(२२४)्नाचिन्ह निर्माण होत आहेत.

‘सॉफ्टवेअर’ तयार करणारा साक्षीदार

‘सौदा’ सॉफ्टवेअर इंदोर येथील उमेश बलवानी नावाच्या व्यक्तीने तयार केल्याची माहिती आहे. नागपुरातील बहुतांश डब्बा व्यापाऱ्यांच्या संगणकामध्ये त्याने तयार केलेले सॉफ्टवेअर सापडले. परंतु हे सॉफ्टवेअर व्यापाऱ्यांना पुरविणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासंदर्भात पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसून बलवानी याला साक्षीदार बनविले आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी चौकशीत काहीही आढळले नसल्याचे सांगितले.