घर बांधून देण्याच्या नावावर ज्येष्ठ नागरिकांना गंडवले

नागपूर : एका बांधकाम व्यावसायिकाने आर्थिक फसवणुकीच्या कायद्यातील पळवाट शोधून आणि यंत्रणेला नियंत्रित (मॅनेज) करून कोट्यवधी रुपयांनी ज्येष्ठ नागरिकांना गंडवले. या विकासकांनी घर (डुप्लेक्स) बांधून दिले तर नाहीच, पण पैसे परत न करता गुंतवणुकदारांना जेरीस आणले आहे.

विजय तुळशीराम डांगरे असे या विकासकाचे नाव आहे. डांगरे यांनी २००५ मध्ये ‘स्वराज पार्क’  नावाची ६४ डुप्लेक्स बंगलो  प्रकल्पाची जाहिरात दिली. अनेकांनी त्यासाठी नोंदणी  केली. गुंतवणूकदारांना नागपूर सुधार प्रन्यासकडून नकाशा मंजूर असल्याचे  सांगण्यात आले. तसे माहिती पत्रकही वितरित करण्यात आले. हा प्रकल्प खसरा क्रमांक २७/१, हलका क्रमांक ३९ मौजा चिखली (खुर्द) येथे प्रस्तावित होता. गुंतवणूकदारांना कालांतराने ही जागा नासुप्रच्या सांडपाणी प्रक्रियाकरिता आरक्षित असल्याचे समजले.  शासकीय उपक्रमासाठी भूखंड आरक्षित असल्याची कल्पना असताना देखील डांगरे यांनी डुप्लेक्स बांधून देण्याच्या नावाने लाखो रुपये लाटले. गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता, प्रत्येक वेळी काम लवकरच सुरू करू, असे खोटे आश्वासन त्यांच्याकडून दिले जात होते. ग्राहकांना आपली फसवणूक होत असल्याचे कळेपर्यंत लाखो रुपये विकासकांना देऊन झाले होते. मग त्यांनी २०११ मध्ये डांगरे यांच्या घरासमोर ठिय्या दिला. तेव्हा विकासकाने थोडेफार काम सुरू केले. पण, जागेचे मूळ मालक सातफळे यांनी जागेचे विक्रीपत्र झाले नसल्याने काम थांबवले. ग्राहकांना पुन्हा मोठा धक्का बसला. डांगरे  हे त्या जागेचे मालक नाहीत. तरीही त्यावर डुप्लेक्स बांधून देतो म्हणून त्यांनी लाखो रुपये लोकांकडून घेतले,  हे कळल्यावर गुंतवणूकदारांनी डांगरे यांच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. तेव्हा डांगरे यांनी त्यांना धमकावणे सुरू केले, असा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. १५ वर्षे लोटून गेले तरी डांगरे हे पैसे करण्यास तयार नव्हते. म्हणून गुंतवणूकदारांनी जानेवारी २०१९ ला सक्करदरा पोलीस ठाण्यात  तक्रार दिली. याप्रकरणी विकासकाविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ५०४, ५०६ (बी) अंतर्गत गुन्हा दाखला झाला. यानंतर डांगरे यांच्या हालचालींना वेग आला. त्यांनी चौकशी टाळण्यासाठी अथक प्रयत्न केले.  वकिलामार्फत सुमारे एक  महिना प्रकरण लांबवले. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तेव्हापासून हे प्रकरण थंडबस्त्यात आहे. पैसे परत मिळतील की नाही,  अशी चिंता ज्येष्ठ नागरिक असलेल्या गुंतवणूकदारांना  सतावत आहे.

मी पैसे द्यायला तयार होतो. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. आता प्रकरण न्यायालयात आहे. -विजय डांगरे, बांधकाम व्यावसायिक.