वनखात्याच्या चमूने स्पष्ट केल्यानंतरही भीती कायम

नागपूर : शहराजवळ येऊन गेलेल्या वाघाच्या पाऊलखुणा काही नागपूरकरांना स्वस्थ बसू देत नाही आहेत. मिहानमध्ये शिरलेला वाघ आता त्याच्या मूळ अधिवासाकडे परत निघाला, पण त्याचे भय अजूनही कायम आहे. मिहान जवळच्या तेल्हाऱ्यात रविवारी वन्यप्राण्यांच्या पाऊलखुणा आढळल्या. लगेच परिसरातील नागरिकांनी वाघ परत आल्याची बोंब ठोकली. मात्र, तपासाअंती त्या वाघाच्या नाही तर श्वानाच्या पाऊलखुणा असल्याचे स्पष्ट झाले.

२५ दिवसांपूर्वी मिहान या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत वाघाने प्रवेश केला. मिहानमधील प्रवेशापासून तर आतापर्यंतच्या २५ दिवसांपैकी सुमारे २० दिवस तरी त्याने मिहानमध्येच मुक्काम ठोकला. मधल्या कालावधीत त्याने मूळ अधिवासाकडे म्हणजेच बोर अभयारण्याकडे पावले वळवली, पण तो पुन्हा परतून आला. मिहान परिसरात त्याने शिकार केल्याचेही स्पष्ट झाले. ठिकठिकाणी त्याच्या पाऊलखुणा आढळून येत होत्या. तीन दिवसांपूर्वी मात्र त्याने बोर अभयारण्याकडे प्रस्थान करण्यावर शिक्कामोर्तब झाले. तरीही मिहान परिसरातील कर्मचाऱ्यांच्या मनातून त्याचे भय जायला तयार नाही. वाघ, बिबट आणि श्वान याच्या पाऊलखुणा जवळपास सारख्या असतात. आकार लहानमोठा आणि थोडाफार फरक असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना या पाऊलखुणा नेमक्या कुणाच्या ते ओळखता येत नाही. रविवारी मिहान परिसरातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना अशाच पाऊलखुणा आढळल्या. वनखात्याची चमू गस्तीवरच होती. तातडीने सूचना मिळाल्याबरोबर ही चमू या परिसरात परतली. रात्रीची वेळ असल्याने वीजदिव्यांच्या प्रकाशात या पाऊलखुणा तपासल्या असता त्या वाघाच्या नव्हे तर श्वानाच्या असल्याचे स्पष्ट झाले. वनखात्याच्या चमूने त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला, पण त्यांच्यातील भीती काही जायला तयार नाही. मिहान या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अनेक खासगी कंपन्या आहेत. हजारो कर्मचाऱ्यांची ये-जा आहे. नेमका त्याच ठिकाणी वाघ शिरला. जाताना पावलाचे ठसे आणि त्याची दहशत मागे ठेवून गेला. त्याच्या प्रवेशानंतर कॅमेरा ट्रॅप लागले, मुखवटे चढले, गस्त सुरू झाली, ड्रोन भिरभिरले. त्याच्या तेथून जाण्यावरही शिक्कामोर्तब झाले.

अंबाझरी परिसरात बिबटय़ाचा वावर कायमच

अंबाझरी जैवविविधता उद्यान परिसरात असलेला बिबटय़ाचा वावर अजूनही  कायम आहे. त्याठिकाणी बिबटय़ाला खाद्य उपलब्ध असल्याने ताने तेथेच मुक्काम केला आहे. सहा डिसेंबरला डुकराची शिकार करताना त्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले होते.  आता पुन्हा एकदा त्याच परिसरात त्याने डुकराची शिकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.