केवळ बारा तासांचे ७६ हजार रुपये उकळले

नागपूर : जामठा येथील कोविडालयामध्ये एकाच परिवारातील तीन रुग्णांना केवळ बारा तासांसाठी भरती ठेवले असता त्यांच्याकडून तब्बल ७६ हजार रुपये उकळण्यात आले. विशेष म्हणजे, या रुग्णांनी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशी कुठलीही सुविधा घेतली नव्हती. असे असतानाही ७६ हजार घेतल्याने रुग्णांकडून होणाऱ्या या लूटमारीविरोधात रुग्णाचे नातेवाईक अतुल खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार केली आहे.

अतुल खोब्रागडे यांच्या तक्रारीनुसार, जामठा येथील कोविडालयामध्ये खाटा आणि व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तीन रुग्णांना घेऊन ते तेथे गेले असता एक लाख रुपये जमा करायला सांगितले. त्यानंतर रुग्णांना दाखल करण्यात आले. मात्र, तेथील व्यवस्था बघता हे रुग्णालय नसून विलगीकरण केंद्र असल्याचे निदर्शनास आले. तरीही काहीतरी उपचार होईल या अपेक्षेने रुग्णांना तेथे ठेवण्यात आले. तिन्ही रुग्णांचा सी.टी. स्कॅन करणे गरजेचे होते. मात्र, येथे तशी कुठलीही सोय नसल्याने बाहेरून सी.टी. स्कॅन करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी दुपारच्या बारा वाजेपर्यंत सी.टी. स्कॅनच करण्यात आले नाही. अखेर  नातेवाईकांनी रुग्णांना हलवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाला याबद्दल सांगण्यात आले. परंतु त्यांनी रुग्णांना सुटी देण्यास पाच तास लावले. एवढेच नाही तर रुग्णांचे फक्त बारा तासांचे ७६ हजार ८९९ रुपयांचे बिल आकारण्यात आले.  केवळ बारा तास भरती राहण्याचे एवढे बिल कुठल्या आधारावर आकारले हा मोठा प्रश्न आहे. करोनाने जनता घाबरली असताना त्यांच्या भीतीचा फायदा घेत अशाप्रकारे आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला आहे.

उर्वरित पैसे देण्यासही नकार

रुग्णांना दाखल करताना सुरुवातीला एक लाख रुपये जमा करण्यात आले. बारा तासांचे  ७६ हजार रुपये वजा करून उर्वरित २४ हजार रुपये नातेवाईकांना परत मिळणे अपेक्षित होते. मात्र, हे पैसे परत करण्यासही कोविडायल प्रशासनाने नकार दिला. उलट पैसे मिळावे म्हणून विनंती अर्ज लिहा, पुन्हा बिलात वाढ होऊ शकते असे सांगण्यात आले.