निराधारांची स्वयंसेवी संस्थांना कळकळीची विनंती

नागपूर : अडचणीच्या काळात पोटाची भूक भागवली यासाठी धन्यवाद, पण एक महिन्यापासून एकच पदार्थ खाऊन प्रकृतीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे शिजवलेल्या अन्नाऐवजी आम्हाला कच्चे अन्नधान्य द्या ते आम्ही शिजवून खाऊ, अशी कळकळीची विनंती विटभट्टीवरील मजूर, झोपडपट्टीतील निराधार आणि बांधकाम स्थळी अडकलेल्या परप्रांतीय कामगारांनी त्यांच्याकडे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना केली आहे.

ट्विंकल फाऊंडेशनकडून टाळेबंदीच्या काळात गोरगरीब, निराधारांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. संस्थेने विटभट्टीवरील मजुरांच्या वस्त्या (नारीभाग), शहराच्या सीमेवरील झोपडपट्टय़ा आणि बांधकामस्थळी अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या छावण्या यासाठी निवडल्या. तेथे त्यांनी प्रथम अन्नाची पाकिटे वाटली नंतर धान्याचेही वाटप केले. तब्बल एक महिनाभर पोलीस आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने फाऊंडेशन हे काम करीत आहे. फाऊंडेशनचे शशांक पाटील म्हणाले, शिजवलेल्या अन्नामध्ये मसाले भात किंवा पुरी-भाजी यापलीकडे दुसरे पदार्थ नसते. त्याऐवजी कच्चे धान्य दिल्यास मजुरांना त्यांच्या मनाप्रमाणे त्याचे पदार्थ करता येतात. त्यामुळेत ते आता अन्न नको तर धान्य द्या अशी विनंती करीत आहेत.

शहराच्या विविध भागात परप्रांतीय बांधकाम अडकून पडले आहेत. कंत्राटदाराने त्यांच्याकडे पैसे दिले व निघून गेला. त्यांच्यासोबत महिला व लहान मुले ही आहे. आम्ही उपाशी राहू शकतो, पण मुले व महिलांचे काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. मोमीनपुरा, इंदोरा भागातील झोपडपट्टीत एका घरात दाटीवाटीने लोक राहतात,त्यांना सामाजिक अंतराविषयी माहिती नाही,  याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

मानेवाडा, कळमना, कामठी, लता मंगेशकर इस्पितळामागचा भाग, पांढराबोडी यासह इतरही झोपडपट्टीत फाऊंडेशनतर्फे धान्य वाटप सुरू आहे. फाऊंडेशनचे दिवेश द्विवेदी म्हणाले.अनेक वस्त्या अद्यापही दुर्लक्षित आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत धान्य पोहचवण्याचे आमचे प्रयत्न आहे. फाऊंडेशनचे श्रुती भिवगडे, ललित बाघ, दामिनी राऊत, शुभम पासेरकर, यश रामटेके यांच्यासह इतरही शहरातील विविध वस्त्यांवस्त्यांना भेटी देऊन गरजू लोकांचा शोध घेत आहे व त्यांना मदत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे.

पोलिसांनी मारले तरी चालेल

टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वाडीतील एका पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या युवकाने त्याचे दुकान पोलिसांची भीती न बाळगता सुरू केले. त्याच्याकडे तीन दिवसांपासून धान्य नसल्याचे त्याची भेट घेतल्यावर कळले. दुकान सुरू झाल्यावर जे काही पैसे येतील त्यातून मुलांना जेऊ घालू, असे त्यांनी सांगितल्याचे द्विवेदी म्हणाले.

धान्याऐवजी अन्नवाटप सोयीचे

टाळेबंदी सुरू  झाल्यावर शेकडो स्वंयसेवी संस्था निराधारांच्या मदतीसाठी पुढे आल्या. प्रथम या संस्थांनी झोपडपट्टय़ांमध्ये कुटुंबनिहाय धान्यवाटप केले. मात्र याला मर्यादा होत्या. १०० किलो धान्य फक्त दहाच कुटुंबांना वाटल्या जात होते. मात्र एवढेच धान्य शिजवून त्यांचे पाकीट वाटले तर त्याचा शेकडो लोकांना फायदा होऊ लागला. त्यामुळे संस्थांनी धान्याऐवजी अन्न वाटण्यावर भर दिला. मात्र अनेकदा अन्नाचा दर्जा निम्नस्वरूपाचा असल्याने व रोज एकच पदार्थ मिळू लागल्याने खाणाऱ्यांपुढेही प्रश्न निर्माण झाल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली.