आरोपी भाजयुमोचा सरचिटणीस

शेतकऱ्यांभोवती असलेले सावकारी कर्जाचे फास आता शहरातील व्यापाऱ्यांच्या भोवती आवळायला लागले आहे. नागपुरातील एका भूखंड व्यावसायिकाने साडेतीन लाखांच्या सावकारी कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नितीन तराळ असे आरोपी सावकाराचे नाव असून अजनी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) या भाजपच्या युवा आघाडीचा सरचिटणीस असल्याचे सांगण्यात येते. सुधाकर बाबर (६०) रा. अजनी रेल्वे वसाहत, असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचे. २०१६ मध्ये त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी ३० टक्के व्याजाने नितीनपासून साडेतीन लाख रुपये कर्ज  घेतले. त्याकरिता एका भूखंड तारण ठेवला होता. त्यानंतर त्याने वेळोवेळी सर्व पैसे परत केले. मात्र, कर्जाची परतफेड झाली नसून एकूण ८ ते ९ लाख रुपये भरावे लागतील, असे तराळ याने सांगितले व भूखंडाचे मूळ विक्रीपत्र परत करण्यास नकार दिला. त्या तणावात सुधाकर बाबरने १९ एप्रिल २०१७ ला विष प्राशन करून आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांचा मुलगा रोहित बाबर व मुलगी कल्याणी बाबर यांनी पाठपुरावा करून अजनी पोलिसांकडे तक्रार दिली व त्यात नितीनच्या सावकारी कर्जामुळे आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला. त्यानंतर अजनी पोलिसांनी चौकशी करून आरोपीविरुद्ध आठ महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे हे करीत आहेत.