काळी-पिवळी मारबत पाहण्यासाठी लाखोंची गर्दी

केंद्र आणि राज्य सरकारने दिलेली खोटी आश्वासने, चिनी वस्तूवरील बहिष्कार, महापालिकेतील भ्रष्टाचार, बोगस आदिवासींना सवलत, विदर्भ विरोधी नेते, दहशतवादाचे समर्थन करणारे पाकिस्तान सरकार, बावनथडी प्रकल्पात पैसा खाणारा नेता आदींवर टीका करणारे आणि समाजातील विविध अनिष्ट प्रथांवरील प्रतीकात्मक बडग्यांची जंगी मिरवणूक पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी उसळली होती. ‘ब्ल्यू व्हेल’ गेमच्या सूत्रधाराचा बडगा चिनी वस्तूंच्या विरोधात आणि स्वतंत्र विदर्भाला विरोध करणारे बडगे यावर्षीचे आकर्षण होते.

विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरांची जपणूक करीत गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानीत दरवर्षी तान्हा पोळ्याच्या दिवशी काळी-पिवळी मारबत आणि विविध लक्षवेधी बडग्यांची मिरवणूक काढली जाते. मंगळवारी मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल शिवाजी पुतळा या भागात मारबत पाहण्यासाठी लाखोंची गर्दी एकत्र झाली होती. डीजेवर बंदी असल्यामुळे ढोल-ताशांच्या निनादावर तरुणाई बेधुंद नाचत होती. यावर्षी छोटे-मोठे ११ बडगे आणि ५ मारबती मिरवणुकीत होत्या.

मासुरकर चौकातील बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळातर्फे एसएनडीएलचे कंत्राट रद्द करा, अशी मागणी करीत एसएनडीएल कंपनीचा बडगा तयार करण्यात आला. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात बडगा तयार करण्यात आला. सार्वजानिक बडग्या उत्सव मंडळाचा दिवासी कास्तकाराच्या बावनथडी प्रकल्पात भ्रष्टाचार करणारा तर स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळाने तयार केलेला बडग्या आकर्षण ठरला. ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मिशन फोर्सने महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात बडग्या तयार केला होता. दक्षिण नागपुरातही मारबत मिरवणूक काढण्यात आली असून त्या ठिकाणी महापालिकेमध्ये सुरू असलेल्या विविध योजनांच्या विरोधात काढण्यात आलेल्या बडग्यांचा समावेश होता. अपंगांना न्याय न देणाऱ्या महापालिकेच्या विरोधात विदर्भ अपंग कल्याणकारी संघटनेने मेडिकल चौकातून बडग्या काढला.

तत्पूर्वी सकाळी तऱ्हाने तेली समाजातर्फे पिवळ्या मारबतीची व नेहरू पुतळा येथील श्री देवस्थान पंचकमेटीतर्फे काळ्या मारबतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. काळी व पिवळी मारबत नेहरू चौकात एकत्र आल्या. दुपारी १२.३० च्या सुमारास पिवळी मारबत शहीद चौकात आल्यानंतर परिसर ढोल-ताशांच्या निनादात दुमदुमून गेला होता. मिरवणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गावर सकाळी १० वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

मारबतीचा इतिहास

ऐतिहासिक काळ्या मारबतीला १३७ वर्षांचा तर पिवळ्या मारबतीला १३३ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघाल्या आणि शहीद चौकात एकत्र आल्या. त्या ठिकाणी एकच जल्लोष करण्यात आला. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत ही मारबत काढली जात आहे. पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३३ वर्षांपासून इतवारी स्थित नेहरू पुतळापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. स्वातंत्र्यकाळात इंग्रजांची सत्ता होती. जुलमी इंग्रजांच्या कारवायामुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली, त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे.

युवकांचा उत्साह

मारबत आणि बडग्या उत्सवातील मिरवणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणात युवा वर्ग सहभागी झाला होता. डीजेवरील बंदीमुळे त्यांचा हिरमोड झाला होता. काही ठिकाणी अतिशय कमी आवाजात त्यावर गाणी वाजविली जात होती. सकाळी ११ वाजता विविध भागांतून बडग्याच्या मिरवणुकी निघाल्या त्यावेळी मोठय़ा आवाजात डीजे वाजविले जात होते. मात्र, शहीद चौकात येताच पोलिसांनी डीजे वाजविण्यापासून रोखले. त्यामुळे अनेक युवकांचा हिरमोड झाला. ढोल-ताशांवर मद्यधुंद अवस्थेत अनेकांनी नाचण्याचा आनंद घेतला.