12 July 2020

News Flash

वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला

कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणाच्यावेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते.

(संग्रहित छायाचित्र)

 

२६ डिसेंबरला दिसणारे सूर्यग्रहण हे २०१९ या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडू या राज्यातील काही शहरातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास असणार आहे.

ग्रहणाची सुरुवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे सकाळी आठ वाजता तर भारतात सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी होईल. सकाळी ११ वाजून दहा मिनिटांनी ग्रहण संपेल. हे या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आहे. २०२० मध्ये २१ जूनला पुन्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणाच्यावेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते. म्हणून सूर्य बिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते, पण कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर जास्त असते. तेव्हा सूर्य बिंब मोठे आणि चंद्र बिंब लहान असते. त्यामुळे चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही. त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते. त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. या ग्रहणाच्यावेळी चंद्राची गडद सावली ही केवळ ११८ किलोमीटरच्या रुंद पट्ट्यातून जात असल्याने त्याच प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते.

ग्रहणाची वेळ

खंडग्रास ग्रहणाची सुरुवात २६ डिसेंबरला सकाळी ७.५९ मिनिटांनी व शेवट दुपारी १.३५ मिनिटांनी होईल. तर खग्रास ग्रहणाची सुरुवात सकाळी ९.०४ मिनिटांनी आणि शेवट दुपारी १२.३० मिनिटांनी होईल. विदर्भ, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी ८.१० वाजेपासून दिसेल आणि सकाळी ११ वाजता संपेल.

ग्रहण चष्म्यातूनच बघावे

सूर्यग्रहण  काळे चष्मे, काही सुरक्षित एक्स रे फिल्म मधून पाहावे. साध्या डोळ्याने पाहिल्यास सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. अंधत्व येऊ शकते. महाराष्ट्र आणि देशातील अनेक संस्था ग्रहण निरिक्षण शिबिरांचे आयोजन करणार आहे. स्काय वॉच ग्रुपतर्फे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणेसह एक चमू मंगलोर येथे कंकणाकृती ग्रहण निरीक्षण आणि अभ्यासासाठी जाणार आहे.

महाराष्ट्रात खंडग्रास

दक्षिण भारतात केरळमधील कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड आणि कर्नाटकातील मंगलोर, म्हैसूर व तामीळनाडूतील कोईमतूर, इरोडे, करुर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई येथून कंकणाकृती दिसेल. महाराष्ट्र  आणि उर्वरित भारतातून ६० ते  ७० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 12:37 am

Web Title: last solar eclipse of the year is on december 26 abn 97
Next Stories
1 नव्या सरकारमध्येही विदर्भविरोधी अन् समर्थक
2 वाघ, बिबटय़ाची शोधाशोध सुरूच
3 ‘फास्ट टॅग’ची सक्ती वाहन चालकांना वेठीस धरणारी
Just Now!
X