24 January 2019

News Flash

आईपासून दुरावलेले बिबटय़ाचे बछडे नागपुरात

मौजा कोका शेतशिवारात ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांना २३ मार्चला बिबटय़ाचे दोन बछडे दिसून आले.

बिबटपासून दुरावलेल्या दोन बछडय़ांना अखेर आज, रविवारी गोरेवाडा बचाव केंद्रात आणले. त

भंडारा वनविभागातील मौजा कोका शेतशिवारात गेल्या २२ दिवसांपासून मादी बिबटपासून दुरावलेल्या दोन बछडय़ांना अखेर आज, रविवारी गोरेवाडा बचाव केंद्रात आणले. तब्बल २३ मार्चपासून हे बछडे या शेतशिवारात होते. मादी बिबट तीनदा येऊनही तिने बछडय़ांचा स्वीकार केला नाही. त्यामुळे यासंदर्भात गठित समितीने अखेर त्यांना गोरेवाडा बचाव केंद्रात पाठवण्याचा निर्णय घेतला.

मौजा कोका शेतशिवारात ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांना २३ मार्चला बिबटय़ाचे दोन बछडे दिसून आले. त्यांनी भंडारा वनविभागाला माहिती दिली. सहाय्यक वनसंरक्षक चोपकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कामगारांना त्या भागात ऊस तोडणीस मनाई केली. पिलांची काळजी घेण्यासाठी कोका अभयारण्याचे क्षेत्र सहाय्यक व बिटरक्षक तसेच दोन मजुरांना तैनात करण्यात आले. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाकडे आगीचे तांडव सुरू असताना बिबटय़ाचे बछडे असणाऱ्या भागातही आग पसरली. त्यामुळे ४ एप्रिलला बछडय़ांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. ९ एप्रिलला मादी बिबट बछडय़ांजवळ येऊन फिरली, पण त्यांना घेऊन गेली नाही. त्यानंतर पुन्हा दोनदा ती याठिकाणी आली, पण आणि यावेळीसुद्धा तिने बछडय़ांना नेले नाही. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने त्यांना शेतशिवारात आणखी ठेवणे योग्य नव्हते. त्यामुळे या बछडय़ांना गोरेवाडा येथील बचाव केंद्रात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ती आली.. तिने पाहिले.. ती निघून गेली..

तब्बल तीनवेळा मादी बिबट बछडय़ांजवळ येऊनही ती त्यांना घेऊन गेली नाही. तब्बल २२ दिवसांच्या या काळात वनखात्याला त्यांची सुरक्षा करता आली नाही. या परिसरात बिबटय़ाचे बछडे असल्याचे कळताच प्रत्येकजण येऊन त्या बछडय़ांना हाताळत होता. ऊस तोडणी करू नका, असे सांगूनही ती करण्यात आली. वनखात्याचे कर्मचारी त्याठिकाणी तैनात असताना देखील हा प्रकार घडला. मादी बिबट वासावरून बछडय़ांना ओळखते. मात्र, या प्रकरणात हे बछडे माणसांच्या सहवासात अधिक काळ आल्याने त्यांना मानवी गंध येत होता. त्यामुळेच तब्बल तीनवेळा बछडय़ांजवळ येऊनही तिने त्यांना स्वीकारले नाही. ती आली, तिने पाहिले आणि ती निघून गेली, असा प्रकार घडला. माणसांच्या चुकीमुळे या दोन्ही बछडय़ांना बंदिस्त व्हावे लागले, अशी खंत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.

First Published on April 16, 2018 6:09 am

Web Title: leopard cub arrived in gorewada rescue centre