कोकिळा उडाली आकाशी

वय वर्षे अवघे दहा.. त्याच्या वयातली मुले खेळतात, बागडतात, हुंदडतात.. पण, ‘तो’ मात्र लहानपणापासूनच अतिशय संवेदनशील आहे. आजूबाजूला थोडीही कुठे मदतीची गरज भासली तर लगेच धावून जातो. त्याच्या या संवेदनशीलतेने आज, सोमवारी मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या कोकिळेला जीवदान मिळाले. कोकिळा आकाशात उडाली आणि ‘त्या’ चिमुकल्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

ध्रुव सुनील मानेकर हा अवघ्या दहा वर्षांचा मुलगा मानेवाडा घाटाजवळ मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता त्याचे लक्ष्य झाडावर गेले. त्याठिकाणी कोकिळा वेदनेने विव्हळत असल्याचे त्याला दिसले. पक्ष्याची ओळख त्याला नव्हती, पण त्याचे विव्हळणे त्याला ऐकू येत होते. पतंगीच्या मांजात अडकल्याने त्याला उडता येत नव्हते. मित्रांना त्याने थांबवले, पण त्यांनी लक्ष दिले नाही. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याने विनवणी केली. मात्र, ध्रुवच्या म्हणण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. त्याचे कुणीही ऐकत नाही हे बघून मित्र त्याची थट्टा मस्करी करू लागले. शेवटी तो रडत रडत घरी गेला.

वडिलांना त्याने घडलेली हकीकत सांगितली. त्या पक्ष्याला कसेही करून वाचवा, अशी विनवणी वडिलांना केली. माणूस जिथे माणसाची किंमत करत नाही, तिथे हा चिमुकला एका पक्ष्याचा जीव वाचवण्यासाठी गळ  घालतोय, हे पाहून वडीलही गहिवरले. ध्रुवला घेऊन ते घटनास्थळी गेले. त्याच्यासमोरच अग्निशमन दलाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. अवघ्या काही क्षणात अग्निशमन विभागाचे वाहन आले. त्यांनी शिडी लावून मांजात गुरफटलेल्या त्या पक्ष्याला बाहेर काढले.

खाली आणले तेव्हा मांजामुळे कोकिळेचे पंख जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ध्रुवचे वडील सुनील मानेकर यांनी जखमी पंखांवर उपचार केले. त्याला पाणी पाजले. कोकिळेच्या अंगात बळ आल्याचे दिसताच त्यांनी तिला निसर्गात मुक्त केले. कोकिळा आकाशी उडताच ध्रुवच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि ते पाहून वडिलांना देखील समाधान वाटले.