आचारसंहिता काळात ११,३१४ बॅनर, फलक काढले; – पहिल्याच दिवशी एक अर्ज दाखल

नागपूर : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात १ जानेवारी २०१९ नंतर ६४ हजार ८५५ अर्ज नवीन मतदार नोंदणीसाठी आले आहेत. निवडणूक आचार संहिता लागल्यावर जिल्ह्य़ातून ११,४१४ बॅनर आणि पोस्टर्स काढले गेले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शकील पटेल (ऑल इंडिया मजलीस ए ईत्तेहदुल मुस्लीमिन) यांनी अर्ज दाखल केला.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली.  ३१ जानेवारी २०१९ नंतर तीन ते चार टप्प्यांमध्ये नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया राबवली. त्यात नागपूर लोकसभेसाठी ४०,५३१ तर रामटेक लोकसभेसाठी २४,३२४ असे एकूण ६४,८५५ अर्ज आले. यावर २५ मार्चपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल.

आचार संहितेदरम्यान प्रशासनाने पहिल्या ४८ तासात २,८४८, त्यानंतरच्या २४ तासात ३,७२५ आणि त्यानंतर आजपर्यंत एकूण ११,३१४ बॅनर आणि पोस्टर्स वेगवेगळ्या भागातून काढले आहेत. तर तक्रारीनुसार आजही प्रक्रिया सुरू आहे.

नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली.

२१ तारखेला होळी निमित्त, २३ आणि २४ ला शासकीय सुटी असल्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. १९, २०, २२ आणि २५ मार्च ला अर्ज स्वीकरले जातील. एका उमेदवारास चार अर्ज सादर करता येणार असले तरी पहिल्या अर्जातील चिन्हच ग्राह्य़ धरले जाईल.उमेदवार जिल्ह्य़ाबाहेरील मतदार संघाचा असल्यास त्याला संबंधित मतदार संघाच्या मतदार यादीत नाव असल्याचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांकडून आणून सादर करणे बंधनकारक आहे. दिव्यांगासाठी वाहनासह इतरही काही विशेष व्यवस्था राहणार असल्याचेही मुदगल यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्तया 

सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक निरीक्षक म्हणून अनुक्रमे विनोदकुमार आणि जे.पवित्रकुमार यांची नियुक्ती केली आहे. नागपूरसाठी नियुक्त विनोदकुमार हे २००५ च्या तुकडीचे महसूल सेवेचे अधिकारी असून सुरत येथे अतिरिक्त आयुक्त (आयकर) म्हणून कार्यरत आहेत. जे.पवित्रकुमार हे भारतीय महसूल सेवेच्या २००८च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

नाना पटोले-नितीन राऊंत भेट

काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांनी पक्षातील वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सर्व गटातील नेत्यांना एकत्र आणून एकदिलाने प्रचाराला लावण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पटोले यांनी आज माजी मंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नागपूरच्या उमेदवार म्हणून अनेकजण दावेदार होते, पण पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे इच्छुकांचा भ्रमनिरास झाला, परंतु पक्षश्रेष्ठीच्या आदेश असल्याने उघड विरोध कोणी केला नाही. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी जुळवून घेण्याची भूमिका सर्वप्रथम घेतली. ते देवडिया काँग्रेस भवनातील बैठकीला उपस्थित होते.  पक्षातील इतर नेत्यांनीही पक्षासाठी काम करण्यास सुरुवात केली. परंतु मात्र काही नेत्यांमध्ये अजूनही थोडी दरी आहे. हे ओळखून पटोले यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांनी आज नितीन राऊत यांची भेट घेतली. नागपुरात येताच त्यांनी कुंभलकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच रवींद्र दुरुगकर यांच्या घरी गेले होते. ते शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यानुसार उद्या, ते वकील संघटनांना भेटणार आहेत.

अवैध दारू प्रकरणात ४९ जणांवर गुन्हे

आचार संहितेच्या काळात नागपूर ग्रामीणमधील ६११ तर नागपूर शहरातीलही अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर या काळात अवैध दारू विक्री, दारू बाळगणे, अवैध दारूची निर्मिती करण्यासह वेगवेगळ्या प्रकरणात ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाने १२ भरारी पथक गठित केले असून ३६ चेक पॉईंट तयार केले गेले आहेत. आजपर्यंत शहरात ९० तर ग्रामीण भागातील ७२ शस्त्र जमा करण्यात आल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

उमेदवारांच्या खर्चावरही नजर

उमेदवाराला निवडणुकीत ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. त्याचा हिशोब उमेदवारांना तीन वेळा सादर करावा लागणार आहे. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष्य ठेवण्यासाठी व्हीडिओ कॅमेरे असलेली व्हीएसटी चमू गठित केली गेली आहे. ही चमू उमेदवारांनी दिलेल्या खर्चाची माहिती योग्य आहे की नाही, याची उलट तपासणी करणार आहे. उमेदवाराने दिलेली आकडेवारी व या चमूच्या अंदाजात तफावत दिल्यास उमेदवाराला जाब विचारून चौकशी केली जाईल. त्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.

मतदार नोंदणीचे अर्ज 

(३१ जानेवारी २०१९ नंतरचे)

————————

मतदार संघ             अर्ज

————————

पूर्व नागपूर            १०,७५३

पश्चिम नागपूर       ५,३९८

उत्तर नागपूर           ७,८१२

दक्षिण नागपूर         ५,९२६

दक्षिण पश्चिम        ५,९०७