|| देवेंद्र गावंडे

सत्ताविरहाचा पाच वर्षांचा काळ काही जास्त म्हणता येणार नाही. भाजपने तर अनेक वर्षे सत्तेविना काढली आहेत. कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना हा पाच वर्षांचा कालावधी एखाद्या युगासारखा भासला असावा. हा निष्कर्ष काढण्याचे कारण सध्याच्या त्यांच्या वक्तव्यात दडले आहे. सत्ताबदल संपूर्ण राज्यात झाला असला तरी विदर्भातील नेत्यांना या बदलामुळे हर्षवायू झाला की काय, अशी शंका येण्याइतपत ही वक्तव्ये आहेत. सत्तेची म्हणून एक नशा असते. त्यात वाहवत न जाण्यातच हित असते. शतकी परंपरा लाभलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना या नशेबद्दल चांगलेच ठाऊक आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून हे नेते सुसाट सुटले आहेत. त्यात अग्रक्रमावर आहेत तिवसाच्या आमदार व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर. सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या ठाकूर प्रथमच मंत्री झाल्या. पक्षात त्या राहुल गांधींच्या टिममधील म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली हे स्पष्ट आहे. आता या संधीचे सोने करायचे की माती, हे त्यांच्या हातात आहे. सध्यातरी त्यांचे वर्तन मातीनिर्मितीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे असे खेदाने म्हणावे लागते.

त्यांनी पहिले बेताल वक्तव्य केले ते स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात. नुकतीच सत्ता मिळाल्याने सध्या आमचे खिसे गरम नाहीत. ते व्हायला अजून वेळ आहे असे त्या म्हणाल्या. विरोधकांनी लागलीच याची तक्रार केली. मात्र सध्या आयोग नावाचे प्रकरण सत्ताधाऱ्यांना वश झाले असल्याने या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. आता ठाकूरांच्या वक्तव्याविषयी. सत्ता आली की खिसे कसे गरम होतात हे राज्यातील तमाम जनेतला ठाऊक आहे. तरीही उघडपणे तसे कुणी बोलत नाही. कारण एकच. राजकारणात असलेल्या प्रत्येकाने पांघरलेला नैतिकतेचा बुरखा. सारी कामे करायची व काही न बोलता या बुरख्याआड दडून राहायचे असेच साऱ्यांचे वागणे. या मंत्र्यांनी हे दडणे झुगारले, त्यामुळे वादाला वाव मिळाला. मग प्रश्न निर्माण होतो तो या नेत्यांनी आजवर जोपासलेल्या प्रतिमेचा. जनतेच्या भल्यासाठी आम्ही सत्तेत आलो. सत्ता ही साधन आहे, ती राबवणारे आम्ही निमित्तमात्र आहोत अशी भाषणे ते कायम देत असतात. मग यात खिसा कुठून आला? आणि खिसा भरायचाच आहे तर तो कुणाचा? हे खिसे भरणे नेमके कसे असते? जनतेच्या कल्याणाचा मार्ग अशा खिशातून जातो काय? यासारखे अनेक प्रश्न या वक्तव्याने उपस्थित केले.अर्थात त्या उत्तरे देण्याच्या भानगडीत पडल्या नाहीत. कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्यासाठी अशी वक्तव्ये करावी लागतात यासारखी स्पष्टीकरणे त्यांच्या वतीने काहींनी दिली.

हा वाद ताजा असतानाच त्यांचे दुसरे वक्तव्य आले. गायीच्या पाठीवरून हात फिरवला की मनातील नकारात्मकता नष्ट होते या आशयाचे. गाय हा उपयुक्त पशू आहे की माता, यावरून गेल्या सहा वर्षांपासून देशात वाद झडत आहेत. उजव्यांच्या मते गाय माता आहे. त्याला विरोध करताना मध्यममार्गी काँग्रेसने सावरकरांचा हवाला देत गाय हा पशूच असा युक्तिवाद वारंवार केला. तो कदाचित यशोमती ठाकूर विसरून गेल्या असाव्यात. त्यांनी ज्या भागात हे वक्तव्य केले तिथे गायीचे मंदिर आहे. आजही गावखेडय़ात गायीचे महत्त्व आहे ते शेतीच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे त्यावर बोलताना मंत्र्यांनी गायीचे महत्त्व सांगितले असते तर ते एकदाचे समजून घेता आले असते. मात्र त्या थेट चमत्कारावर घसरल्या. नकारात्मकता दूर होते हा महत्त्वाचा साक्षात्कार त्यांना कधी झाला ते अजून कुणाला कळले नाही. त्यांचे वक्तव्य मात्र भाजपच्या वतीने उच्चरवात बोलणाऱ्या साध्वींच्या भाषणांची आठवण करून देणारे ठरले.

आजच्या काळात चमत्काराची भाषा करण्यासाठी अनेक जणांना पडलेले आहेत. त्यांच्या रांगेत जाण्याचे काहीच कारण नाही. तरीही राज्याच्या मंत्र्यांनी अशी भाषा करावी हे अतिच झाले. यशोमती ठाकूर गेली पाच वर्षे विरोधी आमदार म्हणून कार्यरत होत्या. सत्ताधाऱ्यांविषयी नकारात्मक बोलणे हे विरोधकाचे कामच असते. या पाच वर्षांत त्या भाजप सरकारवर कधी तुटून पडताना दिसल्या नाहीत. याच काळात कर्नाटकात सत्ता स्थापनेची खेळी खेळताना त्यांची कामगिरी अतिशय प्रभावी होती. तो प्रभाव त्यांनी राज्यात कधी दाखवला नाही. निवडणुकीच्या आधी भाजपने राज्यभर काढलेल्या जनादेश यात्रेचा शुभारंभ त्यांच्या मतदारसंघातून झाला. या यात्रेला काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवा असा आदेश पक्षाने तेव्हा सर्वाना दिला होता. त्याचे पालन शुभारंभस्थळीच झालले दिसले नाही. कदाचित ठाकूरांची सरकारविषयीची नकारात्मकता गायीवरून हात फिरवल्यामुळे लोप पावली असावी. त्यामुळे त्यांनी विरोध केला नसावा. या यात्रेच्या शुभारंभात सरकारी यंत्रणेचा गैरवापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला. त्याविरुद्ध सुद्धा त्यांनी ‘ब्र’ काढला नाही. आताच्या त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांना विरोधकांना शांत करण्यासाठी नवाच मार्ग मिळवून दिला आहे. विरोधकांची नकारात्मकता संपवायची असेल तर त्यांना गायीवरून हात फिरवायला बाध्य करायचे. सध्याचे सत्ताधारी हेच करणार का, हे कळायला मार्ग नाही. आताचे युग विज्ञानाचे आहे. जनतेच्या मनातील चमत्काराची अंधश्रद्धा दूर करण्याचे काम राजकारण्यांचे व सत्ताधाऱ्यांचे सुद्धा आहे. राज्याच्या जबाबदार मंत्री म्हणून ठाकूर यांचेही ते कर्तव्य ठरते. ते पार पाडण्याचे सोडून त्या जनतेला चमत्कार सांगत असतील तर पुरोगामी राज्याचे काही खरे नाही. ठाकूरांचा तिवसा मतदारसंघ तुकडोजी महाराजांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेला आहे. त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेची जळमटे दूर करण्याचे काम निष्ठेने केले. ते करताना अनेकदा त्यांनी गायीचा संदर्भ दिला, पण तो उपयुक्ततेच्या दृष्टीनेच. तशी भूमिका त्यांनी घेतली असती तर बरे झाले असते.

त्या उच्चविद्याविभूषित आहेत. अतिशय मेहनतीने त्यांनी त्यांची कारकीर्द घडवली आहे. राजकारणात जम बसवणे महिलांसाठी सोपे नसते. त्यावर मात करून त्यांनी स्वत:ची चांगली प्रतिमा तयार केली आहे. त्याला तडे देण्याचे काम त्या स्वहस्तेच करू लागल्याने अनेकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. तसेही जीभ सैल सोडण्यासाठी विदर्भ प्रसिद्ध आहेच. वैदर्भीय नेते काहीही बोलतात अशी प्रतिमा त्यातून तयार झाली. ती विदर्भासाठी मारक आहे. याचे भान ठाकूरांनी ठेवणे गरजेचे आहे. सत्ता मिळून शंभर दिवस व्हायच्या आधीच बेताल वक्तव्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेणे त्यांच्यासाठी हिताचे नाही. त्यापेक्षा विदर्भाला काय हवे, याचा विचार त्यांनी केला तर जनता त्यांच्या कार्यक्षमतेला जरूर दाद देईल.

devendra.gawande@expressindia.com