लग्नाचे आमिष दाखवून एका बाराव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. मोहित मथुराप्रसाद गुप्ता (२१) रा. शाहू गार्डनजवळ, सक्करदरा असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.

पीडित १९ वर्षीय मुलगी बाराव्या वर्गात सक्करदरा परिसरातील शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपीचा लहान भाऊ तिच्या वर्गात शिकतो व तिचा मित्र आहे. त्याच्या भावाच्या माध्यमातून जानेवारी २०१६ मध्ये  तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मार्च २०१६ पासून तिच्यावर स्वत:च्या घरी अनेकदा अत्याचार केला. तिने आता लग्नाचा आग्रह धरला असून आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांदिपन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धडे यांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

दोघींचा विनयभंग

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघींचा विनयभंग करण्यात आला. पहिली घटना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ परिसरातील लाहोरी बारजवळ घडली. पीडित २० वर्षीय मुलगी साहिल ऑप्टिकल दुकानासमोरून जात असताना अजय जयसिंग सिखरवार (२३) रा. पांढराबोडी याने एकतर्फी प्रेमातून तिचा हात पकडून विनयभंग केला. दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत पीडित ३६ वर्षीय महिलेच्या घरासमोरून जात असताना मंगल फासे, संजय भांडारकर, गव्या राऊत व त्यांच्या साथीदाराने त्यांच्या कुत्र्याच्या पायावरून दुचाकी नेली. पीडितेच्या पतीने हटकले असता त्याला मारहाण केली व पीडितेने मध्यस्थी केली असता तिचा विनयभंग केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.