राजकीय नेत्यांशी संबंधित महाविद्यालयांचा समावेश

संलग्नीकरणास अर्ज न करणाऱ्या, स्थानिक चौकशी समितीला महाविद्यालयात पाचारण न केल्याने, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने तसेच महाविद्यालयात सुविधा नसल्याने अनेक महाविद्यालयांचे प्रवेश गोठवले आहे. तसेच मूलभूत सुविधांच्याअभावी वेगवेगळ्या महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांचे संलग्नीकरण रद्द केले. आश्चर्य म्हणजे, यातील अनेक महाविद्यालये राजकीय नेत्यांची आहेत.

एकूण ९८ महाविद्यालयांनी २०१८-१९च्या निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले नाही, २९ महाविद्यालयांनी एलईसी लावून घेतली नाही, ८२ महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नाहीत तसेच महाविद्यालयात सोसीसुविधा नसल्याने संलग्नीकरण रद्द करून पुढील सत्रात या महाविद्यालयांमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. यामध्ये नेत्यांच्या महाविद्यालयांचाही समावेश आहे. कोराडी मार्गावरील पांजरा येथील डॉ. नितीन राऊत महाविद्यालय, अत्रे लेआऊटमधील मेघे तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजाभाऊ टाकसाळे यांचे सेंट पॉल विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, नंदनवन येथील पांडव ग्रंथालय आणि माहिती विज्ञान महाविद्यालय, काटोलचे राधिकाताई पांडव महाविद्यालय, बुटीबोरीचे दत्ता मेघे शिक्षण महाविद्यालय, भंडाऱ्याचे मनोहरभाई पटेल शिक्षण महाविद्यालय, वर्धेचे प्रमोद शेंडे कला व वाणिज्य महाविद्यालय, पूलगावचे भोयर शिक्षण महाविद्यालय इत्यादी नेत्यांशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित महाविद्यालयांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केलेले नाही.

अशीही महाविद्यालये आहेत की ज्यांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले मात्र, विद्यापीठाकडून स्थानिक चौकशी समित्यांना महाविद्यालयात भेटीसाठी बोलावलेच नाही. अशा २९ महाविद्यालयांचे प्रवेश गोठवले आहेत. त्यात हनुमाननगरातील अरुण जोशी शिक्षण महाविद्यालय, चांप्याचे विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालय, भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर व साकोली भागातील निर्धनराव पाटील वाघाये शिक्षण, कला व वाणिज्य महाविद्यालय, गोंदियातील शिक्षण महाविद्यालये तसेच वर्धेतील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे.

शिक्षक नसल्याने प्रवेश थांबविले

अभ्यासक्रमांना संलग्नीकरण न घेणाऱ्यांचेही प्रथम वर्षांचे प्रवेश गोठवण्यात आले आहेत. त्यात जरीपटक्याचे दयानंद आर्य कन्या महाविद्यालय, नंदनवन महिला महाविद्यालयातील अनुकमे एम.ए.(अर्थशास्त्र), एम.ए.(मराठी) हे विषय आहेत. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धनवटे नॅशनल महाविद्यालय, जीएच रायसोनी सायन्स अ‍ॅण्ड टेक्नालॉजी महाविद्यालय, पुरुषोत्तम थोटे महाविद्यालय, रेनायसन्स संगणक विज्ञान आणि अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील बीबीए, बीसीए, बीसीसीए, बी.कॉम. इत्यादी अभ्यासक्रमांना शिक्षकच नसल्याने प्रवेश थांबवण्यात आले आहेत. विना शिक्षक सुरू असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. अशी एकूण ८२ महाविद्यालये असून त्यातील १७७ अभ्यासक्रमांचे संलग्नीकरण काढण्यात आले आहे.