20 November 2017

News Flash

प्रतिबंधक लसींकरिता विदेशावरच मदार

स्वाईन फ्लू हा आजार जुना असून वर्ष १९१८ मध्ये त्याला स्पॅनिश फ्लू नावाने ओळखल्या

प्रतिनिधी, नागपूर | Updated: May 20, 2017 1:22 AM

  • स्वाइन फ्लूतील विषाणू बदल
  • फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांचे मत
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

सरकारचे आरोग्य क्षेत्राकडे लक्ष नसून निधीअभावी देशात वैद्यकीय संशोधनही होत नाही. हल्ली काही भागात प्रथमच उन्हाळ्यात ‘स्वाईन फ्लू’ने डोके वर काढले असून विषाणूंमध्ये बदलाचे संकेत आहे. हा अभ्यास आपल्याकडे होत नसल्यामुळे विदेशी संशोधनावरच आपण पुढच्या वर्षी प्रतिबंधात्मक लस मिळवू शकू, असे मत आंतरराष्ट्रीय सीओपीडी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते.

स्वाईन फ्लू हा आजार जुना असून वर्ष १९१८ मध्ये त्याला स्पॅनिश फ्लू नावाने ओळखल्या जात होते. प्रत्येक ५ ते १० वर्षांनी त्याचा उद्रेक व्हायचा. २००९ मध्ये या आजाराचे प्रथमच अनेक देशांत रुग्ण आढळल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला अतिदक्षतेचा इशारा दिला. त्यावेळी प्रथमच भारतात २७ हजार नागरिकांना या आजाराची लागण होऊन ९८० जणांचे  मृत्यू झाले. त्यानंतर अधूनमधून स्वाईन फ्लूच्या विषाणूंनी ‘एच १ एन १, एच १ एन २, एच २ एन ३, एच ३ एन १’ हे गुणधर्म बदलत देशाच्या विविध भागात त्याची साथ पसरली. २०१५ पर्यंत या आजाराची ५२ हजार ५४० जणांना लागण होऊन पैकी ३ हजार ११८ जणांचा मृत्यू झाला. भारतात आजपर्यंत केवळ थंडीत हे रुग्ण आढळत असत. २०१६ मध्ये प्रथमच उन्हाळ्यात रुग्ण दिसून येत आहेत. हल्लीचे रुग्ण बघता या आजाराच्या विषाणूमध्ये बदल झाल्याचे संकेत मिळतात. त्याचा अभ्यास पुण्यातील एनआयव्ही संस्थेतच शक्य आहे, परंतु अद्याप काहीही पुढे येत नाही. देशात विषाणूतील गुणधर्म बदलावर संशोधन होत नसून विदेशात अभ्यास झाल्यावरच खरी स्थिती कळू शकते. विदेशी संस्थांकडूनही प्रथम त्यांच्या देशातील आजारांवर अभ्यास होतो. तेव्हा विलंबाने आपल्या देशातील या विषाणूंवर अभ्यास करून पुढच्या वर्षीच खरी माहिती कळणे शक्य होते.विदेशातून लस येण्यापूर्वी पुन्हा काही विषाणूतील गुणधर्मात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही स्थिती बदलण्याकरिता शासनाने देशात संशोधनावर मोठय़ा प्रमाणात निधी देण्याची गरज असल्याचे डॉ. अरबट म्हणाले.

शासकीय रुग्णालयांत अद्ययावत सेवा असाव्या

शासनाने शासकीय रुग्णालयांत स्वाईन फ्लूसह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांकरिता अद्ययावत सेवा उपलब्ध करण्याची गरज आहे. त्या नसल्यामुळे अनेक रुग्ण खासगी रुग्णालयाचा खर्च झेपत नसतानाही येथे उपचाराकरिता वळतात. उपचारादरम्यान अनेकांना दागिनेच नव्हे तर घर व शेतीही विकावी लागते. हे दुर्भाग्यपूर्ण असून शासनाने या नागरिकांच्या आरोग्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. त्यातच नागरिकांनीही आरोग्य विम्यासह भविष्यातील उपचाराकडे गांभीर्याने बघण्याची गरज डॉ. अरबट यांनी विशद केली.

वेळीच उपचाराने रुग्ण पूर्णपणे बरा होतो

सर्दी, खोकला, वारंवार शिंका, घशात खवखव, थंडी वाजून ताप, अंगदुखी ही ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आहेत. या रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास आजाराचे वेळीच निदान होऊन उपचाराने रुग्ण पूर्णपणे बरा होतो. हा आजार इतरांना होऊ नये म्हणून रुग्णाने एका खोलीतच आराम करणे, गर्दीत जाणे टाळणे, इतरांच्या संपर्कात न येणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. नातेवाईकांनी या रुग्णाच्या संपर्कात कमी येण्यासह वारंवार हात स्वच्छ धुऊन काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. अरबट म्हणाले. हा रुग्ण केवळ स्वाईन फ्लूने मरत नसून त्यामुळे फुफ्फुसावर होणारा घात व निमोनियामुळे दगावत असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येही दहशत

‘स्वाईन फ्लू’ची उपचार करणाऱ्या डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिकांसह सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशत आहे. अनेकांना आजाराची लागणही झाली आहे. त्यामुळे रुग्ण वाढताच हे कर्मचारी विविध कारणे पुढे करीत रजा घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु समुपदेशनासह विविध रुग्णालयांकडून प्रतिबंधात्मक लसी व इतर भत्त्यांचे आमिष दाखवून त्यांना थांबण्याचे प्रयत्न होतात. प्रतिबंधात्मक लसीमुळे हा आजार होणार नसल्याचे ठामपणे सांगू शकत नाही, परंतु त्यानंतरही रुग्ण हितात हे कर्मचारी सेवा देत असल्याचे डॉ. अरबट म्हणाले.

First Published on May 20, 2017 1:19 am

Web Title: lung disease expert dr ashok arbat interview