उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची खंत

‘जुई’ने नऊ वर्षांपूर्वीच प्राण सोडले आणि आता नऊ वर्षांनंतर ‘जाई’ने देखील तिच्या जाण्याचे संकेत दिल्याने महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनच नव्हे, तर शहरातील सारेच व्याघ्रप्रेमी कासावीस झाले आहेत. जुईकरिता दिल्लीवरून विमानाने रक्त बोलावूनही तिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि आता जाईला नऊ वर्षांनंतर किडनीने दगा दिला. माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही किडनी बदलवता आली असती तर जुईसारखाच प्रयोग जाईवरदेखील केला असता, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मेंडकीच्या जंगलातून आईपासून दुरावलेल्या आणि उपाशी अवस्थेतल्या अवघ्या सहा महिन्यांच्या जाई आणि जुई या दोन्ही वाघिणींना महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले. या दोघींचीही प्रकृती त्यावेळी नाजूकच होती, पण जाईने त्यावेळी उपचाराला प्रतिसाद दिला. जुईची प्रकृती मात्र फारच खालावली. त्यावेळी डॉ. दक्षिणकर, डॉ. भोजने, डॉ. धूत, डॉ. उपाध्ये, डॉ. बावस्कर या डॉक्टरांच्या चमूने शर्थीचे प्रयत्न केले. एका वाघिणीसाठी दिल्लीहून विमानाने रक्त बोलावून तिला देण्याचा भारतातला पहिला प्रयोग त्यावेळी याच महाराजबाग प्राणिसंग्रहालयात झाला. जुईमध्ये सुरुवातीला सुधारणाही झाली, पण अचानक प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. नऊ ते साडेनऊ वर्षांच्या जाईला आता साप चावण्याचे निमित्त झाले आणि किडनीने दगा दिला. सुरुवातीला पाय सुजला, पण उपचारानंतर ती बरी झाली. आता पुन्हा तिची प्रकृती खालावली. १७ नोव्हेंबरपासून जाईवर उपचार सुरू आहेत. याच तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू तिच्यावर उपचार करत आहे.

माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही किडनी बदलवता आली असती तर निश्चितच हा प्रयोगसुद्धा केला असता, पण ते शक्य नाही. जाईच्या प्रकृतीत सुधारणा होणेच शक्य नाही. सध्यातरी ती सक्रिय दिसत असली तरीही २४ तास तिला सलाईनवर ठेवावे लागत आहे. खाणे सोडल्यामुळे शिरेमधून तिला पातळ द्रव्याच्या स्वरूपात खायला दिले जात आहे.

आज पुन्हा रक्त तपासणी

शुक्रवारी, २४ नोव्हेंबरला पुन्हा एकदा तिची रक्ततपासणी केली जाणार आहे. मात्र, तिच्यावर केले जाणारे उपचार केवळ औपचारिकता ठरणार असून मृत्यूची वाट पाहणे आहे, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जुईचा अनपेक्षित मृत्यू चटका लावून जाणारा ठरला होता. या दोघींच्या येण्याने प्राणिसंग्रहालय खऱ्या अर्थाने खुलले होते.