अभियांत्रिकीत ‘एक्सलन्स सेंटर’, दस्तनोंदणीसाठीच्या मुद्रांकात एक टक्का सवलत

नागपूर :  महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पात उपराजधानीसाठी अनेक घोषणा करण्यात आल्यात आहेत. त्यात प्रामुख्याने  नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी २४५.३४ कोटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्टता केंद्र) स्थापन करणे, नदी कृती आराखडय़ात नागनदीचा समावेश, चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमधील स्मारक व साधना केंद्रासाठी निधी, कोराडीत नाविन्यपूर्ण ऊर्जा पार्क आदींचा त्यात समावेश आहे. राज्याच्या मेट्रो प्रकल्पांसाठीही ठोस तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यावर मांडण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पात नागपूरला काय मिळते, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. उपराजधानीचे शहर असल्याने उत्सुकताही होती. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी १,६५७ कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी नागपूर मेट्रोला २०२०-२१ या वर्षांत २४५.३४ कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यात एकूण १२ उत्कृष्टता केंद्रापैकी प्रत्येकी एक नागपूरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक वीजनिर्मिती केंद्र विदर्भात आहेत. त्यापैकी कोराडी हे प्रमुख केंद्र असून तेथे देवी मंदिर परिसरात नाविन्यपूर्व ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. मेट्रोसाठी  केलेल्या घसघशीत तरतूद करताना नागपूर मेट्रोचाही विचार करण्यात आला आहे. या शिवाय दस्तनोंदणीसाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात एक टक्का सुट देण्याची घोषणा मंदीत असलेल्या रियल इस्टेट उद्योगाला चालना देणारी ठरणार आहे. नागपुरात मेट्रो प्रकल्पासाठी एक टक्का अतिरिक्त मुद्रांकाची आकारणी केली जात होती. आता सवलत मिळाल्याने भूखंड व सदनिका खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.

असा असेल ऊर्जा पार्क

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर विदर्भात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी नवरात्रीला लाखो भाविक येतात. त्यांना  वीज निर्मितीची माहिती देण्यासाठी ऊर्जा पार्कची निर्मिती करण्यात येणार असून ही संकल्पना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची आहे. कोराडीत कोळशापासून, पाण्यापासून आणि सौर उर्जेपासून तसेच गॅसपासून वीजनिर्मिती केली जाते. याबाबतच्या माहितीसह पवन ऊर्जा आणि उर्जेचे विविध स्रोत कोणते याची माहिती येथे दिली जाणार आहे.  ‘ऊर्जा पार्क’आगामी काळात नागपुरात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. ऊर्जा पार्कमध्ये वीज केंद्रातून तयार झालेल्या विजेचा प्रवास महापारेषण कंपनीच्या उंच मनोऱ्याद्वारे कसा होतो व त्यानंतर महावितरणच्या उपकेंद्राच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरापर्यंत वीज कशी पोहचते याचे मॉडेल या ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. जगदंबा मंदिर परिसरातील खेळण्यासाठी नियोजित जागेत हा ऊर्जा पार्क साकारण्यात येणार आहे.

विदर्भासाठी

* गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने राज्यस्तरीय कर्मचारी,

अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीची स्थापना

* अकोला, अमरावती विमानतळासाठी विशेष निधी

* साकोलीत कृषी महाविद्यालय

* अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय