आधार लिंक असल्यास बँक खात्यातूनच वेतन

महावितरणच्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कामगारांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्यास कामगारांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे.

मुंबईचा काही भाग वगळता राज्यातील कोटय़वधी ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवठा होतो. गेल्या काही वर्षांपासून महावितरणने लाईनमन, विविध देखभाल व दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ, वीज मीटरचे रिडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतरही बऱ्याच संवर्गातील हजारो कामगार कंत्राटी पद्धतीने बाह्य़स्रोतांकडून घेतले आहेत. पैकी अनेक कामगारांकडून वारंवार संबंधित कंत्राटदार वेळेवर वेतन देत नाही, कमी वेतन देणे, किमान वेतन कायद्याला हरताळ फासला जाणे, सर्व कामगारांना विमा सवलत न मिळणे, कुणाचे पीएफ तर कुणाचूी इतर रक्कम संबंधित यंत्रणेकडे भरली जात नसल्याच्या तक्रारी वारंवार महावितरण मुख्यालयाकडे विविध कामगार संघटनेकडून येत होत्या.

या कामगारांवरील अन्याय दूर करण्याकरिता महावितरणने कंत्राटी कामगारांचे वेतन आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून बहुतांश ठिकाणी कामगारांचे वेतन बँक खात्यातून होणे सुरू झाले आहे, परंतु बऱ्याच भागात हे वेतन वेळेवर होत नसल्याचेही पुढे आले आहे. यासाठी बऱ्याच भागात महावितरणचे संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. ते जाणीवपूर्वक काही कंत्राटदारांचे बिल अडवून ठेवत असल्याने कंत्राटदाराकडून कामगारांना विलंबाने वेतन मिळत असल्याचेही काही प्रकरणात आढळले आहे. हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून महावितरणने कंत्राटी कामगारांनाही १ ते ७ तारखेच्या आत वेतन देण्याचे आदेश महावितरणच्या राज्यभऱ्यातील मुख्य अभियंत्यांना दिले असून ते न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून आता थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कामगारांचीही पिळवणूक थांबून त्यांना न्याय मिळण्याची आशा आहे.