पोलिसांच्या कारवाईनंतर बिंग फुटले, बिअरचा मोठा साठा जप्त

नागपूर : शहरातील कुप्रसिद्ध बारपैकी एक असलेल्या मदिरा भवनचा मालक आपल्या नातेवाईकाच्या माध्यमातून औषधाच्या दुकानातून मद्यविक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी छापा टाकून औषधाच्या दुकानातून बिअरचा मोठा साठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून मदिरा भवनच्या मालकाचा हा गोरखधंदा सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.

याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून औषध दुकानाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. निशांत ऊर्फ बंटी प्रमोद गुप्ता (३६) रा. दोसर भवन चौक, गणेशपेठ आणि नरेश गुप्ता अशी आरोपीची नावे असून नरेश गुप्ता या औषध दुकानाच्या मालकाला अटक करण्यात आली. मेयो रुग्णालय चौकात मदिरा भवन बार आहे. हे बार महिलांच्या नृत्यासाठी बदनाम आहे.  दुसरीकडे बार मालकांनी त्यांच्या भागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांशी संगनमत करून बारला कमकुवत सील लावून घेतले. मदिरा बारच्या कुलूपाला उत्पादन शुल्क विभागाने केवळ एक कागद चिटकवला होता. त्यावर कुणाची स्वाक्षरीही नव्हती. मदिरा बारचा मालक निशांत गुप्ताने आपल्या बारचे सील तोडले व त्यातील दारू  नातेवाईकाच्या औषध विक्रीच्या दुकानात ठेवली होती. उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. कुमरे, सहाय्यक निरीक्षक आर. एस. मुलानी, किशोर सूर्यवंशी, रहमत शेख, पंकज बोराटे यांनी मंगळवारी  किंगफिशर, टय़ूबर्ग, हेवर्डस आणि बडवायझर बिअरच्या एकूण ९० बाटल्या, अन्य साहित्य जप्त केले.

लाहोरीसोबतच अनेक बारमध्ये विक्री

हा प्रकार शहरातील अनेक बारसमोर सुरू आहे. यात प्रामुख्याने धरमपेठ येथील लाहोरी बारचेही नाव समोर येत आहे. या बारमधून मोठय़ा प्रमाणात दारू विक्री करण्यात येत आहे. याकरिता पोलीस अधिकारी व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची माहिती आहे.

केवळ हातभट्टीच्या दारूवर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यात येत आहे. पण, ही आकडेवारी सूक्ष्मपणे तपासल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई संशयास्पद वाटते. उत्पादन शुल्क विभाग केवळ हातभट्टीच्या दारूचा साठा पकडत असून बार व वाईन शॉपमधून अवैधपणे विक्री करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करीत नसल्याची बाब समोर येत आहे.