पत्नीला एक दिवसाची पोलीस कोठडी, कडव अद्यापही फरारीच

नागपूर : लोकांना लाखो रुपयांनी गंडवणाऱ्या मंगेश कडव याच्या संपत्तीची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. वेगवेगळ्या बँकांमध्ये त्याची दहा खाती असून त्यात म्हणावी तशी रक्कम नसल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. तो अद्याप फरार असून त्याच्या पत्नी डॉ. रुचिता यांना आज मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

कडवविरुद्ध सक्करदरा, हुडकेश्वर, अंबाझरी, बजाजनगर व सीताबर्डी पोलीस ठाण्यात खंडणी व फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. जुना सुभेदार येथील दिनेश आदमने (४२) यांनी २०१३ मध्ये मंगेश कडव व त्याच्या पत्नीकडून मानेवाडय़ातील अमरिवा अपार्टमेंटमधील सदनिका १६ लाख रुपयांत खरेदीचा व्यवहार केला. आदमने यांनी कडव याला १५ लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम विक्रीपत्राच्या वेळी देण्याचे ठरले. मात्र कडव याने विक्रीपत्र करून दिले नाही. त्यांना धनादेश दिले. तेही वटले नाहीत. आदमने यांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी कडव व त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. कडवविरुद्ध दाखल प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला. खंडणी विरोधी पथकाने सोमवारी डॉ. रुचिता यांना अटक केली. आदमने यांना विकण्यात आलेला फ्लॅट आधीच बँकेत गहाण ठेवण्यात आला होता. आदमने यांना देण्यात आलेल्या धनादेशावर रुचितांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी तपासायची आहे. या प्रकरणात रुचिता यांच्या भूमिकेचा शोध घ्यायचा आहे. फरार मंगेश कडव हा कुठे आहे, याची माहिती काढायची असल्याने रुचिता यांची पोलीस कोठडी देण्याची विनंती गुन्हे शाखेने न्यायालयाला केली. युक्तिवादानंतर न्यायालयाने रुचिता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अनेकांना लाखो रुपयांनी गंडवणाऱ्या मंगेश कडवचे बँक खाते तपासले असता त्यात पोलिसांना ठोस रक्कम मिळून आली नाही. त्यामुळे त्याने पैसा कुठे ठेवला आहे, याचा शोध सुरू आहे.