नियम न पाळणाऱ्यांकडून दंड वसुली

नागपूर :  महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मंगळवारीसुद्धा नियम न पाळणाऱ्यांवर धडक कारवाई केली.

महापौर संदीप जोशी यांनी आज शंकरनगर चौकातून दौऱ्याला सुरुवात केली. वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभूवन चौक, गोकुलपेठ बाजार, रामनगर परिसर या  भागात फिरून शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. बेजबाबदार वागणूकच शहरात पुन्हा एकदा टाळेबंदी लावण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा  इशारा महापौरांनी व्यापारी व नागरिकांना  दिला. दुकानदारांनी  सम आणि विषम तारखांच्या नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करण्याचेही आवाहन त्यांनी केले. लक्ष्मीभूवन चौकातील मंगलकर ज्वेलर्स येथे ग्राहकांची गर्दी दिसून आली. या दुकानमालकाकडून दंड वसूल करण्याचे निर्देश महापौरांनी उपद्रव शोध पथकाला दिले.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सायंकाळी सदर, मंगळवारी बाजार, इंदोरा, नारा, जरीपटका, कस्तुरचंद पार्क, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू परिसरात  लोकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या. नियम न पाळणाऱ्या दुकानदारांना त्यांनी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. कस्तुरचंद पार्क येथील रेमन्डच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. अनेक लोक मुखपट्टी न लावता फिरत होते तर काही दुचाकी वाहनांवर डबलसीट फिरत होते. अशा लोकांवर पोलिसांच्या मार्फत कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील एक महिला दुचाकीवर डबलसीट जात असताना तिला पकडण्यात आले.