सीसीटीव्ही चित्रिकरणानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष

नागपूर : मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयापुढे बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान एमबीबीएसच्या प्रथम वर्षांच्या शंभरेक विद्यार्थ्यांचे ‘रॅगिंग’ घेण्यात आल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महाविद्यालय बंद झाल्यावर हा  प्रकार सुरू होता. त्याचे दृश्य अधिष्ठाता कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये दिसत असतानाही त्याकडे कुणीही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, हे विशेष.

केंद्र व राज्य शासनाने महाविद्यालयांमध्ये रॅगिंग होऊ नये म्हणून अनेक कडक कायदे केले आहेत.  एवढय़ा कडक कायद्यानंतरही अनेक महाविद्यालयांत छुप्या पद्धतीने रॅगिंग होतच असते. परंतु तक्रारी अभावी प्रकरण पुढे येत नाही. बुधवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयाबाहेर महाविद्यालय बंद झाल्यावरही एमबीबीएस प्रथम वर्षांचे विद्यार्थी उभे होते. कुणालाही कोणाला भेटायचे हे माहीत नव्हते. प्रसिद्धी माध्यमांनी काहींना कुणाला भेटायचे, हा प्रश्न विचारला असता घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे बघत वरिष्ठ विद्यार्थी परीक्षेसाठी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

महाविद्यालयाचे वर्ग कुलूपबंद झाल्यावर अधिष्ठाता कार्यालयाबाहेर भर रस्त्यावर कोणता वरिष्ठ विद्यार्थी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होता, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हे विद्यार्थी खरच परीक्षेचे वरिष्ठांकडून मार्गदर्शनासाठी उभे होते की काही इतर कारणासाठी याची चौकशी  प्रशासन करणार काय, हा खरा प्रश्न आहे. या विषयावर मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहींनी नाव न टाकण्याच्या अटीवर हा रॅगिंगचा प्रकार नसल्याचा दावा केला.