एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आशीष लोणारे रा. लालगंज असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडित मुलगी ही बारा वर्षांर्ची आहे. ती मतिमंद असल्याने ती शाळा शिकत नाही. आईवडील मजुरी करतात. आरोपी हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असून क्रीडा चौक परिसरात दुकान लावतो. दरम्यान त्याला पीडित मुलगी ही मतिमंद असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो तिला एकटय़ात गाठून चॉकलेट, खाऊची फूस लावून आपल्यासोबत फिरवू लागला. ती कुणाकडे वाच्यता करणार नाही, असे त्याला वाटले. त्यामुळे दररोज दुपारी तो तिला आपल्या एमएच-४९, टी-२११५ क्रमांकाच्या दुचाकीवर घेऊन जायचा. त्यानंतर संध्याकाळी ४.३० दरम्यान घराच्या शेजारी सोडून द्यायचा. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या वडिलांना संशय आला. शुक्रवारी तिचे वडील पाळत ठेवून होते.

त्यावेळी आरोपी दुचाकीवर तिला मित्राच्या खोलीवर घेऊन गेला आणि संध्याकाळी ४.३० वाजता सोडून दिले. त्यानंतर तिच्या वडिलांनी चौकशी केली असता तिने सर्व प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी पोलिसांत संपर्क करून तक्रार दिली. इमामवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी यांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या ३७६ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली.

नववीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

नागपूर : नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी एक महिला व पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुरुषाला अटक करण्यात आली आहे. दीपक पाटील रा. मिसाळ ले-आऊट असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सोनी रा. मिसाळ ले-आऊट ही महिला फरार आहे. पीडित मुलगी गरीब घरची आहे. काही दिवसांपूर्वी ती जरीपटका येथील दयानंद पार्कमध्ये बसली होती. त्यावेळी सोनी नावाच्या महिलेने तिच्याशी जवळीक साधली. तिची ओळख आरोपीशी करून दिली. ओळखीच्या परिचयातून तिला सोबत घेऊन फिरू लागले आणि १२ जानेवारीला तिला सोबत घेऊन गेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणीने तिने तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. महिलेचा शोध सुरू आहे.