बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी काही केंद्रांवर गोंधळ

नागपूर : बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विविध केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात उशिरा सोडण्यात आल्याने त्यांची तारांबळ उडाली. न्यू कुर्वेज हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर पालकांनी संताप व्यक्त केल्यानंतर १०.३० वाजता विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले.

परीक्षेला सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तासाआधी म्हणजे १०.३० वाजता परीक्षा कक्षात आपल्या बैठक क्रमांकावर बसण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना १०.३० वाजतापर्यंत मुख्य प्रवेशद्वारावरच अडवून ठेवले होते. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर मोठी गर्दी  झाली होती.

शेवटी काही पालकांनी संताप व्यक्त केल्यावर मुख्य प्रवेशद्वार खुले करून विद्यार्थ्यांना आत सोडण्यात आले. त्यानंतर परीक्षा खोली, बैठक क्रमांक शोधण्यामध्ये विद्यार्थ्यांचा बराच वेळ गेला.  विद्यार्थी बैठक क्रमांकावर बसल्यानंतर प्रश्नपत्रिका नीट वाचता यावी, ते गोंधळून जाऊ नयेत यासाठी दहा मिनिटे आधी पेपर देण्यात आला.

प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता. परीक्षेतील पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या विभागाच्या भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांना केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती.

कॉपीमुक्तीसाठी कडक पावले तरीही..

पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. पेपर सुटल्यानंतर पेपर सोपा होता, पेपर चांगला लिहिला, हुश्श.. झाला इंग्रजीचा पेपर अशा प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांनी व्यक्त केल्या. पेपर झाल्यानंतर केंद्राच्या आवारात एकमेकांशी पेपरबाबत परीक्षार्थ्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. कॉपीमुक्त परीक्षेसाठी या वर्षांपासून कडक पावले उचलण्यात आलेली आहेत. असे असले तरी कॉपीचे तुरळक प्रकार घडलेच. विभागामध्ये चार कॉपीची प्रकरणे समोर आली.

परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आईवडील, आजी-आजोबांसह अन्य नातेवाईक यांचे आशीर्वाद  तर काहींनी सकाळी विविध मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी काही पालकांनी सुटी घेतली होती. केंद्राबाहेरील परिसरात विद्यार्थी-विद्यार्थिनी नोट्स, पुस्तकांवर अखेरची नजर टाकताना दिसले.