पुण्यातील मेट्रो भूमिपूजनात डावलणार; सन्मान न मिळाल्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि मेट्रो भूमीपूजन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना व्यासपीठावर बसविण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला आहे. मात्र मोदींशेजारी आसन द्यावे की नाही, हे अनिर्णित आहे. ठाकरे यांना पुणे मेट्रोसाठी आमंत्रित करण्याचा सरकारचा विचार नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तेथे मोदींसमवेत असतील. मात्र दोन्ही कार्यक्रमात मोदींशेजारी आसन असले तरच ठाकरे उपस्थित राहतील, अन्यथा नाही, असे शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे व मेट्रो प्रकल्पांचे भूमीपूजन २४ डिसेंबरला मुंबईत होईल. मोदी बोटीतून समुद्रात जाऊन नियोजित स्मारकाच्या जागेवर जाऊन भूमीपूजन करतील. त्यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मोजकेच निमंत्रित असतील. ठाकरे यांना त्या ठिकाणी आमंत्रित करावयाचे की नाही, हे निश्चित नाही.

मोदी यांची वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर दुपारी दीड वाजता सभा व मेट्रो भूमीपूजनाचा समारंभ होणार आहे. हा शासकीय समारंभ असला तरी इंदू मिलप्रमाणेच भाजपकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शक्तीप्रदर्शन केले जाईल. ठाकरे यांना मोदी यांच्याशेजारी आसन द्यावे आणि योग्य सन्मान राखला जावा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतही केली होती. इंदू मिल, मेक इन महाराष्ट्रच्या वादानंतर राज्य सरकारच्या महत्वाच्या समारंभात ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करुन सन्मान राखण्याचे  मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना राजशिष्टाचार बाजूला सारुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्याशेजारी आसन दिले होते. हा निर्णय पंतप्रधानांचा असतो. उद्धव ठाकरे यांचाही योग्य सन्मान मुंबई व पुणे मेट्रोच्या दोन्ही समारंभात राखला जावा, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.

मुंबईच्या कार्यक्रमातील वाद टाळण्यासाठी ठाकरे यांना व्यासपीठावर बसविण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी ठेवला आहे. मात्र राजशिष्टाचारानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री हे मोदी यांच्या उजव्या-डाव्या बाजूला बसतील. त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री किंवा ठाकरे यांचे आसन असावे, असा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव आहे. ठाकरे यांना व्यासपीठावर आसन द्यावे का किंवा ते शेजारी असावे का, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून राजशिष्टाचारानुसार घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

पुण्यात शरद पवार व्यासपीठावर?

पुण्यात शरद पवार यांच्याहस्ते मेट्रोप्रकल्पाचे भूमीपूजन करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. पवार हे राज्यसभा खासदार आहेत. पण पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मंत्री किंवा खासदारांसाठी स्वतंत्र व्यासपीठाची रचना असते. मात्र पवार यांना मोदींसमवेत व्यासपीठावर बसविण्याचाही मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव आहे. पुण्यातील कार्यक्रमही शासकीय असला तरी ठाकरे यांना त्यासाठी निमंत्रित केले जाणार नाही. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमात मोदींशेजारी आसन देऊन योग्य सन्मान राखला गेला, तरच ठाकरे या समारंभास जातील, अन्यथा इंदू मिलच्या भूमीपूजन समारंभाप्रमाणेच शिवसेना त्यात सहभागी न होण्याचा विचार करु शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.