आरोपीला १३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी; गावात अद्यापही तणावाचे वातावरण

नागपूर : कळमेश्वर तालुक्यात एका गावातील  नराधमाने पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केला. या निंदनीय घटनेआधी शेतात या नराधमाने मोबाईलवर अश्लील चित्रपट बघितल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, मृतदेह सापडल्यानंतर तो गर्दीमध्ये उभा राहून पोलिसांची कारवाई बघत होता. गावातील लोकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली व नंतर त्याने गुन्हा कबूल केला. संजय देव पुरी (३२) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा संजय भारती रा. नागपूर यांच्या मालकीच्या शेतात मजुरी करायचा. मृत बालिका ज्या गावात राहात होती  ते गाव दोन भागात विभागाले असून दोन्ही भागांना जोडणारा रस्ता हा भारती यांच्या शेतातूनच जातो. मृत मुलगी नेहमीच त्या रस्त्याने ये-जा करायची. त्यामुळे आरोपी तिच्या परिचयाचा होता. ६ डिसेंबरला  मुलगी अंगणवाडीत जात असताना आरोपी  शेतात मोबाईलवर अश्लील चित्रपट बघत होता. याचवेळी डोके फिरलेल्या या नराधमाने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मुलगी अत्यवस्थ झाल्याने घाबरली व आपल्याला कारागृहात जावे लागणार या भीतीने त्याने अतिशय निर्दयतेने दगडाने तिचे डोके ठेचले.  मुलगी घरी न परतल्याने आईवडिलांना ती आपल्या आजीकडे असावी, असा समज झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबरला तिची आई आपल्या आईच्या घरी गेली असता तेथे मुलगी नव्हती. त्यांनी  शोधाशोध केली व सायंकाळी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी रात्री शोध घेतला, पण काहीच हाती लागले नाही. दुसऱ्या दिवशी आरोपीच्या भावालाच शेतात मुलीचा मृतदेह सापडला. पोलीस पंचनामा करीत होते. लोकांनी शेतात गर्दी केली होती. त्यावेळी आरोपीही गर्दीत सामील झाला. आपण काहीच केले नाही, अशा अविर्भावात तो वावरत होता. पण, गर्दीतील काहींनी पोलिसांना आरोपी शेतावर काम करणाराच असावा, असे सांगितले. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याला आज सोमवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता १३ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हैदराबादच्या धर्तीवर ‘एन्काऊंटर’ची मागणी

या घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला आहे. आरोपीला कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी लोकांनी रविवारी कळमेश्वर पोलीस ठाण्याला घेराव घातला. सोमवारीही शहरात बंद पाळण्यात आला. व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये सकाळपासूनच बंद होती. या घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी भव्य मोर्चा काढून आरोपीला फाशी द्या, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. स्थानिक बाजार चौकातून युवक-युवतींनी लाँगमार्च केला. आंदोलनकर्त्यांनी हैदराबादच्या धर्तीवर पोलिसांनी आरोपीचा ‘एन्काऊंटर’ करावा किंवा त्याला जनतेच्या स्वाधीन करावे, अशी मागणी लावून धरली.

बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढवले

मृत मुलगी आदिवासी कुटुंबातील असल्याने पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा,  बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे कलम गुन्ह्य़ात वाढवले आहे. सोमवारी आरोपीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले असून ते आरोपीच्या वैद्यकीय तपासणीवेळी स्वत: मेडिकलमध्ये उपस्थित होते. त्याशिवाय रविवारी रात्री उशिरापर्यंत ते कळमेश्वरमध्ये होते.  लोकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन ओला यांनी यावेळी केले.

भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

रविवारी सायंकाळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोद्दार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील लोकांनी परिसरात प्रथम मेणबत्ती लावून घटनेचा निषेध नोंदवला. त्यानंतर मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळला. मोर्चातील कार्यकर्ते अतिशय आक्रमक होत होते. त्यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून गर्दी पांगवली. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला.

आरोपीच्या कुटुंबालाही संरक्षण

आरोपी संजय पुरी हा मूळचा सावंगी मोहगाव येथील असून तो अविवाहित आहे. तो कुटुंबापासून वेगळा  मित्राच्या घरी भाडय़ाने राहत होता. लोकांचा आरोपी संजयविरुद्ध रोष असून कुणी त्याच्या भावाच्या कुटुंबाला त्रास देऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांनाही गावातून दुसरीकडे हलवले. पोलिसांच्या खबरदारीमुळे मोठी घटना टळल्याची भावना गावात व्यक्त केली जात आहे.