१ जुलैपासून दरवाढ; बांधकाम क्षेत्रातून नाराजी

नागपूर : ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला चालना मिळावी म्हणून राज्य शासनाने एकीकडे खरेदी-विक्री व्यवहारासाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कात सवलत दिली. मात्र दुसरीकडे बांधकामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाच्या स्वामित्वधनात १ जुलैपासून घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना ४ जून रोजी काढण्यात आली आहे. शासनाचा हा निर्णय एका हाताने देणे व दुसऱ्या हाताने काढून घेण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

टाळेबंदीमुळे ‘रियल इस्टेट’मध्ये मंदी आल्याने शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. मात्र मार्च २०२१पासून करोनाची दुसरी लाट आल्याने याचा विशेष लाभ या क्षेत्राला झाला नाही. त्यातच ४ जून २०२१ रोजी राज्य शासनाने गौण खनिजाच्या स्वामित्वधनात वाढ करणारी अधिसूचना काढली. यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या गिट्टी, वाळू, मुरूम व तत्सम साहित्याची दरवाढ होणार आहे. त्यामुळे घरबांधकामाचा खर्च वाढणार आहे. त्याचा परिणाम घराच्या किमतीवरही दिसून येईल.

घरावरील कवेलूसाठी वापरण्यात येणाऱ्या मातीसाठी प्रति ब्रास ६०० रुपये (पूर्वीचे दर ४००), बंधारे, रस्ते, लोहमार्ग, इमारतीची जागा सपाटीकरणााठी लागणारी मातीसाठी ६०० रुपये प्रति ब्रास, तर विटांसाठी लागणाऱ्या मातींसाठी २४० रुपये (पूर्वीचे १६० रुपये) प्रति ब्रास स्वामित्वधन आकारण्यात येणार आहे. गृह व इतर सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांसाठी (ग्रेनाइट वगळून) ३ हजार रुपये (पूर्वीचे दर १,९२०) प्रति ब्रास निश्चित करण्यात आली आहे. सरासरी ५० टक्क्यांहून अधिक ही दरवाढ आहे. विशेष म्हणजे, तीन महिन्यांहून अधिक काळ टाळेबंदी असताना भाडेपट्ट्यावर घेतलेल्या खाणींतील उत्खनन काही ठिकाणी ठप्प, तर काही ठिकाणी अत्यल्प स्वरूपाचे होते. त्यामुळे या व्यवसायावर मंदीचे सावट असताना ही दरवाढ होणार आहे. बांधकासाठी लागणाऱ्या गौण खनिजातही यामुळे वाढ होणार आहे, अशी प्रतिक्रिया नागपूर जिल्हा स्टोन क्रशर असोसिएशनचे प्रमुख रमेश गिरडे यांनी दिली.

स्वामित्वधनाचे सुधारित दर

स्वामित्वधनाचे सुधारित दर १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहेत. त्यानुसार बांधकामासाठी लागणाऱ्या चुनखडी, दगड, दगडांचा चुरा यासाठी प्रति ब्रास ६०० रुपये (पूर्वीचे दर ४०० रुपये प्रति ब्रास), बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘लेटरनाइट स्टोन’ प्रति ब्रास १५० रुपये (पूर्वीचे दर १०० रुपये), मुरूम, बारीक खडी आणि दगडांसाठी प्रति ब्रास ६०० रुपये (पूर्वीचे दर ४०० रुपये), वाळूसाठी मुंबई महानगर क्षेत्रात प्रति ब्रास १२०० रुपये (पूर्वीचे ८०० रु.) तर इतर क्षेत्रासाठी ६०० रुपये प्रति ब्रास (पूर्वीचे ४०० रुपये) असे दर निश्चित करण्यात आले आहेत.