नागपूर : स्पाइस हेल्थच्या करोना आरटीपीसीआर  फिरत्या चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण गुरुवारी सुरेश भट सभागृह परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचणी अहवाल २४ तासात मिळणार असला तरी तो कालावधी १२ तास करण्याचा सुद्धा प्रयत्न असून तशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. चाचणीचा अहवाल  मोबाईलवरच मिळणार  असल्यामुळे  प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही. शहरातील रुग्णालयांमध्ये प्राणवायूची कमतरता लक्षात घेता २०० व्हेंटिलेटर आले आहेत. लवकरच ५०० प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर सुद्धा येणार असून त्याचे वितरण जिल्ह्य़ासह विदर्भात  होणार आहे, असे गडकरींनी स्पष्ट केले.  प्राणवायू वाहतुकीसाठी विदेशातून क्रायोजेनिक कंटेनर खरेदी करण्याचे प्रस्तावित असून तीन हजार  सिलेंडर खरेदी करून ते विदर्भात वितरित करण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर  विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान सामाजिक दायित्व निधी अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड  लिमिटेडतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राणवायू प्रकल्पासाठी १५ कोटी रुपये  देण्याचा अंतिम प्रस्ताव तयार झालेला आहे तसेच इतर ५  रुग्णालयाला सुद्धा सामाजिक दायित्व निधीमधून हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे  प्रकल्प करण्यासाठी  निधी देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी  महापालिका आयुक्त  राधाकृष्णन बी., स्पाईस हेल्थचे संचालक अजय सिंग आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, तिसरी लाट येणार!

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्याप सुरूच असताना गडकरींनी मात्र तिसरी लाटही लवकरच येणार असल्याचे या कार्यक्रमात सांगितले. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीच तसा इशारा दिला असून करोनाच्या तिसऱ्या लाटेतही या फिरत्या प्रयोगशाळेचा मोठा उपयोग होईल, अशी अपेक्षाही गडकरींनी व्यक्त केली.