मुकुल वासनिक यांचा आरोप

तत्कालीन संपुआ सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी लागू केलेली पंचायतराज व्यवस्था मोडीत काढण्याचा घाट मोदी सरकारने घातला असल्याचे त्यासाठीच्या अत्यल्प तरतुदीवरून दिसून येते. ही तरतूद अर्थसंकल्पात ७ हजार कोटींवरून ९६ कोटी एवढी कमी करण्यात आली आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी केली.

नागपूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पंचायतराज व्यवस्थेमुळे १४ लाख महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. जगाच्या पाठीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात महिलांना संधी देण्याचे काम कुठेच झालेले नाही, तसेच ग्रामीण भागाकरिता अधिकाधिक निधी उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागाचे बळकटीकरण होऊ लागलेले असताना या पंचायतराज मंत्रालयाच्या निधीवरच घाला घालण्यात आला आहे. अशा प्रकारे हे मंत्रालय गुंडाळण्याचे धोरण मोदी सरकारचे आहे असा आरोप त्यांनी केला.

नापिकी व दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता असताना कर्ज माफ केले जात नाही, परंतु पंतप्रधानांच्या विश्वासातील उद्योजक गौतम अदानी यांच्यावरील २०० कोटी रुपयांचा दंड मागे घेण्यात येतो, यावरून हे सरकार कोणासाठी काम करत आहे, हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.