मद्यधुंद अवस्थेत शेजाऱ्याचा गळा चिरला

नागपूर : उपराजधानीत ११ दिवस थांबलेले खुनाचे सत्र  पुन्हा सुरू झाले आहे. खुनाची घटना कळमना पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली.

प्रमोद तेजराम उदापुरे (३८)   असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सतीश ऊर्फ दद्दू वाघमारे (२५) याला अटक केली. साहिल व अंकित नावाचे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. . पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या घटना गांभीर्याने घेऊन शहरात क्रॅकडाऊन-२ मोहीम राबवली. याचा परिणाम म्हणून गेले पंधरा  दिवस शहरात खून किंवा मोठी गंभीर घटना घडली नाही. यापूर्वीचा खून १ जुलैला सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झाला होता. तेव्हापासून शहरात खुनाची घडली न घडल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बिनतारी संदेशाद्वारा सर्व पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांचे अभिनंदन करून असेच प्रयत्न सुरू ठेवण्यास सांगितले होते. दरम्यान कळमना पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या गुन्हयातील आरोपी किंवा मृताची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पण कौटुंबिक कलह व दारू पिण्याच्या वादातून तिघांनी मिळून एकाचा खून केला. प्रमोद व आरोपींना दारुचे व्यसन आहे. प्रमोद हा दररोज दारू पिऊन पत्नीशी भांडण करायचा व तिला मारहाण करायचा. याला शेजारी कंटाळले होते. सतीश त्याच्या घरापासून १० फूट अंतरावर राहतो. दोन दिवसांपूर्वी प्रमोदने नेहमीप्रमाणे पत्नीला मारहाण केली. त्यानंतर तो सतीश व इतरांसोबत दारू प्यायला पुन्हा गेला. दारू पिण्याच्या वादातून त्यांच्यात वाद झाला व तिघांनी मिळून त्याचा कळमना-ईतवारी रेल्वेलाईनजवळ प्रमोदचा गळा चिरून खून केला. ही घटना रविवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपासात हा खून असल्याचे निष्पन्न झाले.