प्रदूषणासाठी औष्णिक विद्युत प्रकल्प कारणीभूत; ‘ग्रीनपीस’च्या अहवालातील माहिती

शहराभोवताल वायुप्रदूषणाचा विळखा घट्ट होत असून प्रदूषणाच्या यादीत शहराचा क्रमांक वरवर सरकत आहे. या प्रदूषणासाठी औष्णिक विद्युत प्रकल्प कारणीभूत ठरत आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातूनच श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण शहरात वाढले आहे. त्यावर पर्याय शोधण्याऐवजी मात्र आणखी दोन संचाची त्यात भर घालून प्रदूषणवाढीला प्रोत्साहन दिले जात असल्याची टीका पर्यावरण अभ्यासकांकडून होत आहे.

उपराजधानीची ओळख ‘हिरवे शहर’ अशी आहे, पण ही ओळख आता बदलत चालली आहे. विकास कामांमुळे या हिरवळीवर कुऱ्हाड चालवली जात आहे. शहरातील वाढत्या वायुप्रदूषणासाठी विकासकामेच नाही तर औष्णिक विद्युत प्रकल्पही तेवढेच कारणीभूत आहेत. कोराडी आणि खापरखेडा असे दोन औष्णिक विद्युत प्रकल्प शहराजवळ आहेत. या प्रकल्पामुळे श्वसनाशी संबंधित आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले आहे. ग्रीनपीस या पर्यावरण संस्थेने जाहीर केलेल्या प्रदूषणाच्या अहवालात ही नोंद आहे. कोराडी प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका आतापर्यंत आजूबाजूच्या गावांना बसत होता. या प्रदूषणाने आता शहरात प्रवेश केला आहे. शहरातील प्रदूषणाची ही स्थिती जाणूनच पर्यावरणवाद्यांनी त्यावर पर्याय शोधण्याची मागणी केली. मात्र, त्यावर पर्याय शोधण्याऐवजी त्यात आणखी दोन संचाची भर घातली जाणार आहे. हे दोन्ही संच प्रदूषणमुक्त असल्याचा दावा शासन करत असले तरीही त्यावर विश्वास ठेवावा का, ही शंका कायम आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१० मध्ये कोराडी येथील वीज निर्मिती केंद्रात सल्फर डाय ऑक्साईडचे प्रदूषण कमी करणारी यंत्रणा लावण्याची अट घातली होती. या अटीची पूर्तता आजपर्यंत झालेली नाही. आता ग्रीनपीसच्या अहवालात सल्फर डाय ऑक्साईडच्या प्रमाणात वाढ झालेली दाखवली आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे नागपूर आणि चंद्रपूर ही दोन्ही शहरे प्रदूषित झाली आहेत. या प्रकल्पातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या घटकांमध्ये श्वसनाशी संबंधित विकार होण्यास कारणीभूत सल्फर डाय ऑक्साईड, किरणोत्सर्ग आणि हवा प्रदूषित करणारे पीएम २.५ आणि पीएम १० हे बारीक कण असतात. जे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करून मनुष्याच्या अकाली मृत्यूला कारणीभूत ठरतात. सल्फर डाय ऑक्साईडच्या पातळीत ३२ टक्के तर पीएम २.५ कणांच्या पातळीत ३४ टक्के वाढ झाली आहे. शहरात असणाऱ्या अधिकांश वृक्षांमध्ये वायु प्रदूषण कमी करणारी वृक्ष अतिशय कमी आहेत.

ग्रीनपीसने २०१९मध्ये जो प्रदूषणाबाबत सादर केलेल्या अहवालात भारतात सल्फर डाय ऑक्साईड अधिक असणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा नंबर आहे. त्यातही चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यतील कोराडीचा समावेश त्यात आहे. याव्यतिरिक्त मध्यप्रदेश सिंगरौली, छत्तीसगडमध्ये कोरबा, ओडिशात जलचर आणि झारसगुडा, तामिळनाडूत नेवेली आणि चेन्नई, गुजरातमध्ये कच्छ, तेलंगणामध्ये रामागुंडम हे सर्वाधिक सल्फर डायऑक्साईड उत्सर्जित करणारे राज्य आणि त्यातील शहरे आहेत.

पर्यावरणचे निकष जोपर्यंत १०० टक्के पाळले जात नाही, तोपर्यंत नवीन संचाला परवानगी देऊ नये. खासगी प्रकल्पांवर जशी निकषांच्या बाबतीत नजर ठेवली जाते, ती सरकारी प्रकल्पांबाबतही हवी. मात्र, मुळात प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी आपली यंत्रणा दुबळी आहे, हे खेदाने म्हणावे लागते.

-अपरूप अडावदकर, पर्यावरण अभ्यासक