दोन धावपट्टय़ांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला गती आली असून, काही किरकोळ बदल करून विकास आराखडय़ाला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आराखडय़ानुसार पहिल्या टप्प्यात दुसरी धावपट्टी तयार करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात दोन्ही धावपट्टीच्या मधोमध टर्मिनल इमारती उभारण्यात येणार आहेत. यासोबत विमानतळावर प्रवेशासाठी खापरी प्रवेशद्वार राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या पाच वर्षांपासून विमानतळ विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु खासगी कंपन्यांनी यात तयारी दाखवलेली नाही. यामुळे विकास आराखडा दोन भाग करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक कामे करण्यात येतील आणि दुसऱ्या टप्प्यात गरजेनुसार कामे हाती घेण्यात येतील. पहिल्या टप्प्यात दुसरी धावपट्टी तयार करणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय छोटय़ा आकाराची इमारत आणि  टॅक्सी-वे तयार करण्यात केले जाणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाच वर्षांपूर्वी आले. मिहान-सेझ प्रकल्पाला लागून असलेला या विमानतळाला कार्गो हबच्या दृष्टीने विकसित करण्याची योजना आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून हा विकास साधला जाणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रतिसाद मिळत नाही. आता वैश्विक निविदा काढण्यात येणार आहे. विमानतळ विकासाला खासगी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विमानतळाचा मेकओव्हर दोन टप्प्यात करावयाचा आहे. दुसऱ्या टप्प्यात टर्मिनल इमारत, विमान पार्किंग एरिया आणि इतर कामे करण्यात येतील.

मिहान-सेझ प्रकल्पामध्ये उद्योगधंदे सुरू होण्यासाठी हवी तशी गती मिळाली नाही. नागपूरच्या परिसरात आर्थिक वृद्धी होऊ शकेल अशी गुंतवणूक झालेली नाही. नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असले तरी २१ येणारी आणि २१ जाणारी उड्डाणे आहेत. येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोजक्याच देशासाठी आहे. या वस्तुस्थितीचा विचार करता विमानतळ विकासित करण्यासाठी खासगी कंपन्यांनी उत्सुकता दाखवली नाही. गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्वीच्या आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. आता दोन टप्प्यात विमानतळ विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.

दुसऱ्या धावपट्टीचे दोन टप्पे

हवाई दलास दुसरी धावपट्टी तयार करून देणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यात ३२०० मीटर धावपट्टी बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ८०० मीटर धावपट्टी तयार करण्यात येईल. मिहानमध्ये ‘कार्गो हब’ तयार करण्यात येणार आहे. प्रवासी वाहतूक आणि कार्गो वाहतुकीसाठी विमानतळ विकसित केले जाणार आहे. यासाठी संरक्षण खात्याची जमीन घेण्यात आली आहे. त्यामोबदल्यात संरक्षण खात्याला दुसरीकडे जमीन देण्यात आली आहे. सध्या हवाई दल स्थानक आणि विमानतळ जवळ-जवळ आहे. मिहानमध्ये संरक्षण खात्याची जमीन गेल्याने हे अंतर वाढणार आहे.  इंधन खर्च तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने धावपट्टी हवाईतळापासून कमीत कमी अंतरावर असणे सोयीचे असते. यामुळे पहिल्या टप्प्यात दुसऱ्या धावपट्टी विकसित करणे अत्यावश्यक करण्यात येत आहे.

नवीन आराखडा दोन टप्प्यांमध्ये आहे. काही विकास कामे वगळण्यात आली आहेत. विमानतळ विकसित करण्याची कामे आंतरराष्ट्रीय निकषानुसार होतील. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. विकास आराखडा विधि खात्यांकडून आला असून, त्यांच्या सूचनेनुसार विकास आराखडय़ात बदल होत आहेत.’

– अवधेश प्रसाद,

वरिष्ठ संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur dr babasaheb ambedkar airport restructured will change
First published on: 02-03-2016 at 03:38 IST