नियोजनाअभावी कामालाही विलंब

विद्यापीठ वाचनालय ते विद्यापीठ प्रशासकीय इमारत यादरम्यान महाराजबागेतून रस्ता तयार करण्याचा खर्च महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे दुप्पट होऊन १० कोटींवर पोहचला आहे तर नियोजनातील गलथानपणामुळे रस्त्याच्या कामाला विलंब होत आहे तो वेगळाच!

नागपूर महापालिका महाराजबागेतून २४ मीटर लांबीचा रस्ता बांधत आहे. त्याचा खर्च ४ कोटी ७४ लाख २६ हजार रुपये निश्चित करण्यात आला. रस्त्याचे कामाला सुरुवात झाली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला नाल्या खोदण्यात आल्या. हे काम सुरू असताना या रस्त्यांच्या मधोमध एक जुना पूल असल्याचे कंत्राटदार आणि प्रशासनाला दिसले. नवीन पूल बांधण्यासाठी स्वतंत्र निविदा काढली आणि पुलाच्या कामासाठी ४ कोटी ७५ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यानच्या काळात रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले. त्यानंतर रस्ता विकासाचा सुधारित प्रस्ताव आला. यामध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वळण रस्ता करण्याचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या कामाचे कंत्राट २ सप्टेंबर २०१५ ला कंत्राटदार मे. एस.के. गुरूबक्षाणी यांना देण्यात आले. या कंत्राटदाराला वाढीव काम देण्यात आले असून, सुधारित कामाच्या प्रस्तावासाठी ५ कोटी ५० लाख १५ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या पुलाचे काम १० कोटी २५ लाख १५ हजार रुपयांवर गेले आहे. रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यापूर्वी त्या रस्त्यांचा सव्‍‌र्हे आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून बांधकामाला नाहरकत प्रमाण प्रशासनाने प्राप्त केले नाही. यामुळे रस्त्याचे काम सुरू झाल्यावर पुलासाठी वेगळी निविदा काढावी लागली. तसेच कृषी विद्यापीठाने सुचविल्याप्रमाणे रस्त्याला दोन्ही बाजूला वळण (कव्‍‌र्हेचर) करण्यासाठी सुधारित खर्चाला प्रस्ताव आणावा लागला आहे.

महाराजबागेतील हा रस्ता नागपूर शहर मंजूर आराखडय़ाअंतर्गत प्रस्तावित डी.पी. (विकास प्रारुप) रोड आहे. महापालिकेने या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम हाती घेतले. परंतु त्यापूर्वी रस्त्यावर करावयाच्या कामांचे सर्वेक्षण केले नाही. शिवाय कृषी विद्यापीठाकडून रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेतले नाही. रस्त्यांचे काम सुरू झाल्यावर डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने सुचविलेल्याप्रमाणे मूळ प्रस्तावात वळण विकसित करण्याचा समावेश करणे भाग पडले. त्यासाठी सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आली. यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली.

कृषी विद्यापीठाने महाविद्यालयासमोरील स्तंभ न हटवता मार्ग काढण्याची सूचना केली. त्यामुळे रस्त्याला वळण विकसित करावे लागत आहे, असे प्रशासनाने कबूल केले आहे. शिवाय पोलीस खात्याकडून वाहतूक बंद करण्याची परवानगी उशिरा मिळाली. तसेच मध्यंतरी क्रशर असोशिएनचा संप झाला आणि कामाची व्याप्ती वाढल्यामुळे डांबरीकरणाचे काम वगळून इतर कामे ३१ मे पर्यत पूर्ण करण्यात येतील. डांबरीकरणाचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

सुधारित खर्चाला मंजुरी देण्याचा गोरखधंदा

महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून या रस्त्यावर वळण करण्यात येत आहे. रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी जमीन मोजणी करताना कृषी विद्यापीठाने हरकत घेतली. याचा अर्थ निविदा काढण्यापूर्वी रस्ता बांधण्याचे, रस्ता कुठून विकसित करावयाचा आहे हे निश्चित झाले नव्हते. शिवाय रस्ता रुंदीकरणात पुलाचा समावेश नव्हता. काम सुरू झाल्यानंतर अतिरिक्त काम काढून सुधारित खर्चाला मंजुरी देण्याचा गोरखधंदा महापालिकेत सुरू आहे.