पहिल्या दिवशी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद 

नागपूर : आज बुधवारपासून शहरातील मॉल सुरू झाले. परंतु पहिल्या दिवशी ग्राहकांचा अल्प प्रतिसाद  लाभला. विविध ठिकाणची व्यावसायिक संकुले मात्र बंदच होती.

तब्बल पाच महिन्यांपासून शहरातील सर्व मॉल व  व्यावसायिक संकुले बंद असल्याने व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले होते. त्यांचे कोटय़वधींचे नुकसान होत होते. अखेर ५ ऑगस्टपासून सर्व मॉल सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखवली. त्यामुळे बुधवारी शहरातील सर्व मॉलमध्ये सकाळपासून  निर्जंतुकीकरणाचे काम सुरू झाले.

शहरात चार ते सहा मोठे नामांकित मॉल असून काही छोटे व्यावसायिक संकुले आहेत. मॉलमध्ये ग्राहकांसाठी विशेष खबरदारी घेण्यात येत होती. प्रवेश द्वाराजवळ तापमान तपासल्यानंतर मुखपट्टी घालणे बंधनकारक करण्यात आले होते. शौचालय आणि लिफ्टमध्ये सामाजिक अंतराचे भान राखण्यासाठी विशेष सोय करण्यात आली होती. एम्प्रेस मॉल, इटरर्निटी आणि सेंट्रल मॉल आज सुरू झाले  तरी येथील फूड कोर्ट,प्ले एरिया आणि मल्टिप्लेक्स बंद  होते. रामदासपेठ येथील सेंट्रल मॉल, बरामजी टाऊन येथील पूनम मॉल, एम्प्रेस मॉलमधील काही दुकाने मात्र बंद होती. याबाबत विचारणा केली असता सम-विषम पद्धतीमुळे दुकाने सुरू ठेवणे परवडणारे नाही, असे सांगण्यात आले.

मार्च महिन्यांपासून मॉल बंद असल्याने नोकरी बंद होती. त्यामुळे काही काळ वडिलांच्या दुकानात फळभाज्या विकून त्यांना मदत केली. आता मॉल सुरू झाल्याने आनंद आहे. आमचे वेतन निम्मे मिळणार असले तरी कामावर आहोत याचे समाधान आहे.

– विजय निमखेडे, काऊंटर बॉय, एम्प्रेस मॉल

सर्व खबरदारी घेऊन मॉल सुरू करण्यात आले आहेत. परंतु सम-विषम पद्धत मॉलसाठी लागू असल्याने काही दुकाने सुरू तर काही दुकाने बंद आहेत. इतर मॉल बद्दल मात्र सांगता येणार नाही.

– पारसनाथ जयस्वाल, व्यवस्थापक,  इटरर्निटी मॉल