शहर विकासासाठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी; महापौर संदीप जोशी यांची लोकसत्ता कार्यालयाला  सदिच्छा भेट

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना व्यक्तिगत विरोध असण्याचे काहीच कारण नाही. विरोध आहे तो त्यांच्या हुकूमशाही व एककल्ली कामाच्या प्रवृत्तीला. शहर विकासासाठी  एक पाऊल मागे घेऊन त्यांची भेट घेण्याची माझी तयारी आहे, असे स्पष्ट मत महापौर संदीप जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत सध्या गाजत असलेल्या आयुक्त विरुद्ध महापौर संघर्ष या मुद्यासह शहर विकासाच्या प्रश्नावरही त्यांनी स्पष्ट मते मांडली. आयुक्तांविरोधातील संघर्षांबाबत जोशी म्हणाले, आयुक्त तुकाराम मुंढे यांना आमचा विरोध नाही, त्यांच्या प्रवृत्तीला आहे. आम्ही आताही शहर विकासाच्या मुद्यावर तडजोडीस तयार आहोत. एक पाऊल मागे घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. त्यांनीही एक पाऊल पुढे टाकावे.

मुंढे रुजू झाल्यानंतर महापालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवादच संपला. आमचा फोन ते घेत नाहीत, पत्राला उत्तरे देत नाहीत.  मित्रांच्या माध्यमातून संदेश पाठवतात, पण स्वत: बोलत नाही. हे योग्य नाही. आम्ही जनप्रतिनिधी आहोत. खरे तर आयुक्तांनी रुजू झाल्यावर महापौरांची भेट घेण्याची परंपरा आहे. मात्र त्यासाठी त्यांना सतरा दिवस लागले. यातूनच त्यांच्या स्वभावाची कल्पना यावी. या उपरही  मी शिष्टाचार बाजूला सारून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कक्षात गेलो. वाद मिटावा आणि शहर विकासाची कामे पुढे जावी हा यामागे उद्देश होता. पण, त्यानंतरही त्यांच्या भूमिकेत बदल झाला नाही.

महापालिकेची देणी २१०० कोटींवर गेल्यामुळे नवी विकास कामे करायचीच नाही ही मुंढे यांची भूमिका अनाकालनीय आहे. राज्यात पिंपरी चिंचवड महापालिकेचा अपवाद सोडला तर इतर सर्व महापालिका त्यांच्या उत्पन्नाच्या चारपट कामाचे नियोजन करते. आम्हीही तेच केले. जी कामे मंजूर केली त्याची देणी नंतर चुकती करायची होती. तोपर्यंत निधीची तजवीज होऊ शकली असती. किंवा आमच्याशी चर्चा करून मार्ग काढता आला असता. पण, सरसकट कामांनाच स्थगिती देणे हा यावरचा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाची कामे थांबली व नगरसेवकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली, असे जोशी म्हणाले.

माध्यमांनी मुंढे यांची प्रतिमा जशी निर्माण केली तसे ते प्रत्यक्षात असते तर बरे झाले असते.पण दुर्दैवाने तसे ते नाहीत. त्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोपही जोशी यांनी केला.

स्मार्ट सिटीबाबत तडजोड नाही

शहर विकास कामांसाठी महापौर म्हणून माझी नेहमीच तडजोडीची तयारी असली तरी स्मार्टसिटी प्रकल्पाबाबत मुंढे यांनी केलेल्या चुका गंभीर असल्याने हे प्रकरण मी लावूनच धरणार आहे. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे  जोशी यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत यापूर्वीच पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही त्यांनी निक्षूण सांगितले. स्मार्टसिटी प्रकल्पावरील त्यांची नियुक्तीच अवैध आहे. बँकेत खाते उघडताना नियमभंग झाला आहे.  या प्रकरणाबाबत मुंढे यांनी केलेले दावे दिशाभूल करणारे आहेत. नियम डावलून त्यांनी काम केले आहे व याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नियम त्यांनीही पाळावेत

मुंढे आम्हाला नियम सांगतात. पण स्वत: ते पाळत नाही. आयुक्तांना रजेवर जायचे असेल तर स्थायी समिती अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. मंजूर झालेल्या फाईल्सवर सात दिवसात अंमल होणे आवश्यक असतो. महापौरांच्या पत्राला आयुक्तांनीच उत्तर द्यायचे असते, हे सुद्धा नियमच आहे. पण, आयुक्तांनी रजेसाठी कधीच परवानगी घेतली नाही. तत्कालीन मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी १३५दिवस फाईल्स अडवून ठेवली. महापौरांच्या पत्राला उपायुक्त उत्तरे देतात. वैद्यकीय अधीक्षकांच्या विरोधात पुरावे देऊनही कारवाई केली जात नाही.  एकीकडे कर्मचारी कपातीचा आग्रह धरला जातो व दुसरीकडे खासगी विशेष कार्यासन अधिकारी (ओएसडी) नियुक्त केला जातो. मग नियमांचा आग्रह आमच्यासाठीच का, असा सवाल जोशी यांनी केला.

.. म्हणून नगरसेवक विरोधात

नगरसेवकांचा विरोध याच आयुक्तांना का,  याचाही विचार होणे आवश्यक आहे. लोक त्यांच्या कामासाठी नगरसेवकांकडे जातात. ही कामे घेऊन नगरसेवक आयुक्तांकडे जातात. पण ते त्यांना भेटतच नाही. त्यामुळे त्यांची ओरड आहे. यापूर्वी २५ वर्षांत अनेक आयुक्त आले. पण, त्यांच्याबाबत असे प्रसंग कधीच आले नाही, असेही जोशी म्हणाले.