भव्यदिव्य इमारतींवर होणारा खर्च आणि त्यासाठी लागणारा वेळ यावर पर्याय म्हणून मेट्रो रेल्वे प्रशासनाकडून ‘स्टिल बिल्डिंग’च्या पर्यायावर विचार केला जात आहे. झिरो माईल्स इमारतीच्या संदर्भात व्यवस्थापन असा निर्णय घेऊ शकते. तसे संकेतही अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नागपूर मेट्रो रेल्वेचे काम सध्या शहरात धडाक्यात सुरू आहे. दोन वर्षांत ३० टक्क्यांवर काम पूर्ण झाले असून पुढच्या दोन वर्षांत शहरात मेट्रो धावू लागेल, असे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून सध्या काम सुरू आहेत. मेट्रो रेल्वेच्या महत्त्वाच्या आणि आकर्षक स्थानकांपैकी झिरो माईल स्थानकाची इमारत असून सध्या या इमारतीचे काम सुरू झाले आहे.

हेरिटेज वॉकसह इतरही अनेक सुविधा येथे उपलब्ध राहणार असून झिरो माईल्सचे महत्त्व कायम ठेवून येथे २० मजली इमारत उभारण्याचे प्रस्तावित आहे. सुरुवातीला पाच मजली इमारत बांधण्यात येणार असून त्यानंतरचे मजले उभारणीसाठी स्टीलचा वापर करता येईल का, याबाबत मेट्रोचे तंत्रज्ञ विचार करीत आहेत.

वेळ आणि खर्च कपातीसाठी या पर्यायावर विचार सुरू असल्याचे संकेत महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी दिले. या इमारतीचा आराखडा फ्रान्सच्या कंपनीने तयार केला आहे. वास्तूविशारद क्षेत्रात जागतिक पातळीवर नाव असलेली ही कंपनी असून येत्या काळात या कंपनीचे काही अधिकारी नागपूरला भेट देण्याची शक्यता आहे. त्यावेळी या पर्यायांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

देशात मुंबईसह इतरही मोठय़ा महानगरात अशाप्रकारच्या इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. झिरो माईल्सचे देशपातळीवरील महत्त्व लक्षात घेऊन सुरुवातीला एनआयटीच्या माध्यमातून येथे सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव होता. त्यानंतर त्या परिसरातील जागा मेट्रो स्थानकासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव आला. आता महामेट्रो हे स्थळ विकसित करणार आहे.

दरम्यान, मेयो इस्पितळाजवळील रामझुला क्रॉसिंगजवळील मेट्रो मार्गासाठी उभारण्यात आलेल्या पिल्लरवर पहिला ‘गर्डर’ टाकण्याचे काम सोमवारी पूर्ण करण्यात आले. २२० टन क्षमतेच्या क्रेनद्वारे २२ मीटर लांब आणि ४५ टनाचा गर्डर पिल्लरवर ठेवण्यात आला. यासाठी चार तास लागले. ही क्रिया पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.