महापालिकेकडून करोनाग्रस्तांच्या जीवाशी खेळ

नागपूर : उपराजधानीत रोज हजार ते दीड हजार नवीन करोनाबाधितांची भर पडत असतानाच महापालिकेकडून चक्क सप्टेंबरमध्ये मुदतबाह्य़ होणाऱ्या औषधांचे वाटप केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

करोनाग्रस्तांना महापालिकेकडून औषध उपलब्ध केले जाते. या औषधांपैकी झिंकच्या गोळ्यांवर मुदत संपण्याची तारीख चक्क सप्टेंबर- २०२० असल्याचे खुद बाधितांकडून पुढे आणण्यात आले आहे. सध्या सप्टेंबर महिना सुरू असला तरी पहिल्या आठवडय़ात ही मुदत संपत असल्यास मुदतबाह्य़ औषधे बाधितांनी खायच्या काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा गंभीर प्रकार असतानाही त्याकडे महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांकडून  एकही शब्द काढला जात नसल्याने सर्वत्र आश्चर्य  व्यक्त होत आहे.  या विषयावर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. तर या प्रकाराला जबाबदार असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी बळीराजा पक्षाचे राज्य महासचिव नरेंद्र पालांदूरकर यांनी केली आहे.