स्थायी समिती अध्यक्षांसाठी सुधीर राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महापौर, सत्तापक्ष नेते आदींचे निवासस्थान असलेल्या या भागातूनच आता महापालिकेची तिजोरी सभाळणारे स्थायी समितीचे अध्यक्षही येऊ घातले आहेत. त्यामुळे मध्य नागपूर येणाऱ्या काळात ‘पॉवरफूल’ म्हणून ओळखले जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असणे ही या मागची कारणे. शहराच्या राजकारणात महापालिकेत असलेली मुख्य पदे मात्र शहरातील विविध मतदारसंघातील असायची. पालिकेच्या निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असताना आता सत्ताकेंद्र पश्चिम नागपूरपेक्षा मध्य नागपुरात ठेवायचे असा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून स्थायी समिती अध्यक्ष म्हणून सुधीर (बंडू) राऊत यांच्या नावावर संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केले. विधान परिषदेसाठी बिनविरोध निवडून आलेले भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास मध्य नागपुरातील आहेत. राज्याचा कारभार जरी पश्चिम नागपुरातून चालणार असला तरी त्याच्या चाव्या मात्र मध्य नागपुरात आहेत. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीची नव्या सदस्यांची नियुक्ती सभागृहात एकमताने झाली आहे. नागपूर विकास आघाडीकडून सुधीर राऊत, जगदीश ग्वालबंशी, संगीता कळमकर, रामदास गुडधे, पुरोगामी लोकशाही आघाडीकडून संजय महाकाळकर, सुरेश जग्यासी, कुमुदिनी कैकाडे, इफ्तीखार अशरफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नागुलवार यांची नियुक्ती झाली. १ मार्चला आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्याजागी नागपूर विकास आघाडीकडून मुन्ना पोकुलवार, अश्विनी जिचकार, अनिल धावडे व दिव्या धुरडे यांची नियुक्तीचा निर्णय संसदीय मंडळाने घेतल्याची माहिती नेते दयाशंकर तिवारी यांनी दिली.