सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष; ‘महिला पोलिसांचा बुद्धय़ांक कमी असतो’वर तीव्र प्रतिक्रिय

‘महिला पोलिसांचा बुद्धय़ांक कमी असतो’, असा जावईशोध लावणारे पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव स्वत: महिलांच्या कामाचे मूल्यमापन करण्यास अक्षम आहेत किंवा त्यांची वृत्ती पक्षपाती आहे. इतर सर्व क्षेत्रात महिलांचा बुद्धय़ांक दिसून येत असताना पोलीस दलातच त्यांचा बुद्धय़ांक का कमी ठेवला जातोय? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या सचिव अ‍ॅड. सुहासिनी साखरे म्हणाल्या, महिला पोलिसांचा बुद्धय़ांक कमी असतो असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्याला एक तर लाभापासून वंचित असलेल्या परिघावरील (मार्जिनल) लोकांच्या अडचणी कळत नाहीत आणि दुसरे म्हणजे संबंधित अधिकारी स्वत: महिलांच्या कामाचे मूल्यमापन करण्यास अक्षम आहेत. साधारणत: परिघावर जगणाऱ्या दलित, निग्रो किंवा आदिवासींना मुख्य प्रवाहात सामावून घेताना काही सवलती प्रदान कराव्या लागतात. महिलांच्या बाबतीतही आपल्याला तेच म्हणता येईल. पण महिलांच्या बाबतीत पुरुषी मानसिकतेतून नेहमीच शोषण केले जाते.

एकतर महिला नेटवर्किंग करायचा गेल्या की त्याचे श्रेय अलगत पुरुष घेतात. शिवाय जातीची बंधने आणि लिंग विषमतेचा अनुभव महिलांचा असतो. त्यामुळे टीम वर्क किंवा नेटवर्किंगचे काम करता पुरुष सहज महिलांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटतात आणि त्यासाठी शोषण करतात. मुळात महिला काम करतात पण, त्याचे श्रेय त्यांना घेता येत नाही, ते जोखण्याची क्षमता यादव यांच्यात नसल्याचे स्पष्ट दिसते. दुसरे म्हणजे संबंधित अधिकारी पक्षपाती वृत्तीचे असल्याचे स्पष्ट होते. कामाचे मूल्यमापन करणे ही देखील एक कला आहे. महिला पोलीस काही परग्रहावर काम करणाऱ्या नाहीत. त्यांचा बुद्धय़ांक कमी असतो, असे जर अधिकाऱ्याला वाटत असेल तर तशी व्यवस्था यादव सारख्या अधिकाऱ्यांनीच बनवली असल्याचे स्पष्ट दिसते. संकुचित मानसिकतेतून यादव यांचे हे म्हणणे आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. रूपा कुळकर्णी म्हणाल्या, यादव यांचे विधान मनुयुगातील असून अजून ते पारंपरिक विचारसरणीतून बाहेर पडलेलेच नाही. आज त्यांच्या सहकाऱ्यांपैकी पोलीस अधीक्षक, गुन्हेशाखेच्या अधिकारी दीपाली मासिरकर, महासंचालक मीरा बोरवणकर याही महिलाच आहेत ना! यादव यांचे विधान पदाला शोभत नाही सुबुद्ध नागरिक म्हणूनही शोभत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेत महिलांना निर्भय वातावरण प्रदान करणारे पोलीस असे मनुयुगातील विधाने करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां लीला चितळे म्हणाल्या, स्त्री व पुरुषांचा मेंदू सारखा असतो. पण परिस्थिती मात्र दोघांनाही वेगवेगळी दिली जाते. चार भिंतीच्या आत अनुभवाचे ज्ञान जेवढे राहील तेवढेच ते इतरांच्या लक्षात येईल, पण तिला अवकाश मिळाला तर ती नक्कीच करून दाखवते. म्हणूनच सर्वच क्षेत्रात महिलांची भरारी दिसून येते. मग पोलीस दलातच यादव यांना ती का जाणवत नाही.