नागपूर : शहरात गुरुवारीही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागपूकरांची चांगलीच तारांबळ उडाली. मिळेल त्या ठिकाणी त्यांनी आसरा शोधला. हवामान खात्यासह हवामान अभ्यासकांनी दोन दिवसांपूर्वीच वादळी पावसाचा अंदाज दिला होता.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास हलका पाऊस झाला, तर बुधवारी देखील मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गुरुवारी मात्र, दुपारी एकच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मात्र, विजांचा आणि ढगांच्या आवाजाच्या तुलनेत पावसाचा जोर कमी होता. तरीही अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याने रस्त्यावर चिखल साचला.  खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त झाले. सलग दोन दिवसांच्या या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला.