प्रवेश, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल आदी ऑनलाईन सेवांच्या आधारे तंत्रज्ञान क्रांती आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांची प्राथमिक माहिती शोधायचा कुणी प्रयत्न केला तर त्याची दिशाभूल होण्याची शक्यताच जास्त असते. देशविदेशात असणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादे प्रमाणपत्र हवे असल्यास विद्यापीठाकडे कुठलीही डिजिटल सुविधा उपलब्ध होत नाही. याचा विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. याचे पडसाद शुक्रवारी विधीसभेच्या बैठकीत उमटले.

विधिसभा सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी प्रश्नोत्तरामध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळाची माहिती विचारली असता विद्यापीठाकडे संकेस्थळ हाताळणारी स्वतंत्र यंत्रणाच नसल्याचे समोर आले. विद्यापीठाने संकेतस्थळाचे सव्‍‌र्हर ‘आऊटसोर्स’ केले असून याची जबाबदारी विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान शास्त्रांकडे दिली आहे. मात्र, ५०० महाविद्यालयांचा डोलारा सांभाळणाऱ्या विद्यापीठाचे संकेतस्थळ अद्ययावत नाही. योग्य आणि जुजबी माहितीही एका क्लिकवर मिळत नाही. त्यामुळे सदस्यांनी या सभेत विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीची माहिती, विविध अभ्यासक्रमांचे प्रश्नसंचही मिळत नसल्याची बाब विधीसदस्य डॉ. धनश्री बोरीकर आणि अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी प्रश्न आणि प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केली. संकेस्थळासंबंधात सदस्यांच्या वारंवार तक्रारी येत असल्याची बाब सदस्य विष्णू चांगदे यांनी लक्षात आणून दिली. अ‍ॅड. वाजपेयी यांनी विद्यापीठाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यावेळी सदस्य सरिता निंबार्ते यांनीही ऑनलाईन सुविधांसंदर्भात प्रस्ताव सादर केला. यावर सदस्यांनी कुलगुरूंना घेराव घालत शतकोत्तर वर्षांकडे वाटचाल करीत असलेल्या विद्यापीठाच्या या मागासलेपणावर ताशेरे ओढले.  यासर्व बाबींवर विचार करून लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिले. तसचे पाच सदस्यीय समिती स्थापन करून संकेतस्थळ आणि डिजीटलायजेशनसंदर्भात आवश्यक त्या सर्व गोष्टी करणार असल्याचे सांगितले.

‘नॅक’च्या तोंडावर विद्यापीठाचे हसे

विद्यापीठाला डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि मानांकन परिषदेच्या (नॅक) मूल्यांकनाला सामोरे जायचे आहे. नव्या मूल्यांकन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांकडून  ‘फिडबॅक’ घेण्यात येणार आहे. यामध्ये विद्यापीठाकडून उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा आणि संकेतस्थळावरुन मिळणारी माहिती पुरेशी आहे काय, यावरही गुणांकन होणार आहे. मात्र, विद्यापीठाचे संकेतस्थळ अद्ययावत नसल्याने विद्यापीठ नॅकसमोर तोंडघशी पडण्याची शक्यता आहे.

महाविद्यालयांची प्राथमिक माहितीही नाही

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सर्व महाविद्यालयांची माहिती एका क्लिकवर पाहण्याची सोय आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांंत ही माहिती अद्ययावत झालेली नाही. त्यामुळे, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर महाविद्यालयांची माहिती घेऊ  इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोपही सदस्यांनी केला.  संलग्नता विभागात अभ्यासक्रमानुसार महाविद्यालयांचा शोध घेता येतो. यात महाविद्यालयांचा संपूर्ण पत्ता, ईमेल, दूरध्वनी क्रमांक, शिकविले जाणारे अभ्यासक्रम, जागांची संख्या आदी प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.  मात्र, काही जुजबी माहिती वगळता हे बहुतांश सर्वच रकाने रिक्त आहेत.