महेश बोकडे

विद्यार्थी, नोकरदार, महिलांचे अनेक ग्रुप; भ्रमंतीचा आनंद अन् शारीरिक सुदृढताही

सायकलला एकेकाळी प्रचंड वलय होते, परंतु पुढे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक प्रगत वाहने आली आणि अनेकांच्या जीवाभावाची सायकल अडगळीत पडली. ती अगदी वर्ष-दोन वर्षांपर्यंत अडगळीतच होती. आता मात्र पुन्हा सायकलचे दिवस फिरले आहेत. शारीरिक सुदृढतेसाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे डॉक्टर मंडळी सांगत असल्याने घरी महागडय़ा वाहनांचा ताफा असतानाही लोक परत सायकलकडे वळले आहेत. अनेक नागपूरकरही सायकलच्या प्रेमात पडले असून  विद्यार्थी, नोकरदार, महिलांचे अनेक ग्रुप स्थापन झाले असून ते अगदी ठरवून लॉंग राईड आयोजित करीत असतात.

प्रत्येक घरात वाहन असणे वाईट नाही, परंतु या वाढत्या वाहनांचा पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम बघता त्यावर नियंत्रण हवे आहे. सोबत आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम म्हणूनही सायकल चालवणे आवश्यक आहे. ही गोष्ट आता पुन्हा नागपूरकरांना पटू लागली आहे. त्यामुळे अनेकांनी सायकलचा पर्याय स्वीकारला आहे. ही मंडळी कुठेही जाताना सायकलचा वापर करतात. याप्रसंगी रस्त्यावर कुणी सायकलच का, असे विचारले तर ते सायकलचे महत्त्वही पटवून सांगतात. सायकलिंगमुळे मधुमेहग्रस्तांतील काहींच्या औषधांची मात्राही कमी झाल्याचा अनुभव या मंडळींना आला आहे.

औषधांचे प्रमाण कमी होते

सायकल चालवणे हा उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे गुडघा, दोन्ही पाय, पाठीचा कणा, खांदा, दोन्ही हात, पाठ या अवयवांचा व्यायाम होतो. स्नायू मोकळे होतात. सायकलमुळे हवा, ध्वनी यापैकी कोणतेही प्रदूषण होत नाही. नियमित १० ते २० कि. मी. अंतर सायकलने पार केल्यास आरोग्य उत्तम राहते. शिवाय पचनक्रिया, भूक लागणे, सहनशक्ती, शरीर बळकट होण्यास मदत होते. या व्यायामाने औषधांची मात्राही कमी होते, परंतु हळूहळू सायकलिंग वाढवायला हवी. एकाच वेळी नवीन व्यक्तीने जास्त काळ सायकल चालवल्यास त्याला त्रास होऊ शकतो.

– डॉ. आकाश सावजी,  अस्थिरोग शल्यचिकित्सक

सायकलने कात टाकली

इतर प्रगत वाहनांप्रमाणेच सायकलमध्येही नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. वेगवेगळ्या वापरासाठी वेगवेगळे डिझाईन, जाड, दणकट, बारीक, हलके, बुटके, उंच अशा सर्व प्रकारच्या विशिष्ट धातूत बनवलेल्या फ्रेम्स वापरल्या जात आहेत. त्याचप्रमाणे सायकलचे टायर्सही डिझाईन केले जात आहे. सायकल चालवण्यास सोपी व्हावी म्हणून त्यात गेअरही देण्यात आले आहेत. महागडय़ा सायकलवर विविध प्रकारच्या अ?ॅक्सेसरीजही लावल्या जातात. सायकलिंगमध्ये हौस व फिजिकल फिटनेस दोन्ही गोष्टी पूर्ण होतात. अशा ग्रुपमध्ये डॉक्टर्स, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, निवृत्त शासकीय अधिकारी अशा अनेक वयोगटातील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व गटांमध्ये विचारांची देवाण-घेवाण देखील वाढल्याचे चित्र आहे.

– अनिरुद्ध रईच,  एन्साक्लोपिडीया बाईक स्टोर्स, संचालक

उपराजधानीतील  सायकलिंग ग्रुप

*  सुपर राँदेनियर्स

*  मॉर्निग रायडर्स

*  सॅडल अप गाईज

*  हॉक रायडर्स

प्रवासासाठी पसंतीचे मार्ग

* रविनगर ते कोंढाळी

*  पागलखाना चौक ते सावनेर

*  फ्रेन्ड्स कॉलनी ते आदासा

*  छत्रपती चौक ते बुटीबोरी ’

*  पारडी ते मौदा

*  छत्रपती चौक ते खापरी-दिघोरी