शहरातील प्रदूषण मापक यंत्रावरून आधीच संभ्रमाची स्थिती असताना आणि तो गुंता सुटलेला नसताना, आता नवीन येणाऱ्या स्वयंचलित प्रदूषण मापक यंत्रांनी त्यात भर घातली आहे. शहरातील आधीची यंत्रे प्रदूषण नसणाऱ्या आणि अत्यल्प प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी लावली आहेत. नवीन स्वयंचलित यंत्रही अशाच ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या हवेतील प्रदूषणाचे प्रत्यक्षात प्रमाण किती, हा प्रश्न कायम राहणार आहे.

देशभरातील प्रदूषित शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आल्यानंतर शहरातील हवेच्या प्रदूषणाबाबत गांभीर्याने चर्चा होऊ लागली. सिव्हिल लाईन्स परिसरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या इमारतीच्या छतावर, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ, उत्तर अंबाझरी मार्गावर आणि हिंगणा व सदर परिसरात प्रदूषण मापक यंत्र लावण्यात आली. नवीन स्वयंचलित चार यंत्रे नीरी, व्हीएनआयटी, एलआयटी आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरात लावण्यात येणार आहेत. जुन्या आणि प्रस्तावित यंत्रांसाठी प्रदूषण नसणारे ठिकाण निवडण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रदूषणाची प्रत्यक्षातील स्थिती कळणार नाही आणि ही स्थिती कळली नाही तर त्यावर उपाययोजना करता येणार नाही. सुमारे दोन कोटी रुपये खर्चून बसवण्यात येणारी यंत्रणा परिणाम देणार नसेल तर हा खर्च वाया जाईल. तीन-चार वर्षांपूर्वी शहरात स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्यात येणार होते.

बुटीबोरी परिसरात या यंत्राची उभारणी सुरू असतानाच त्याचे काही भाग चोरीला गेले आणि यंत्रणा स्थापित होण्यापूर्वीच ठप्प झाली. त्यामुळे स्वयंचलित प्रदूषण मापक यंत्राचेही तर असेच होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हवेतील प्रदूषण संपूर्ण शहरात पसरले आहे. उत्तर नागपुरातून होणारे प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रदूषणाचे मुख्य ठिकाण असणाऱ्या ठिकाणी प्रदूषणमापक यंत्र लावण्याची मागणी होत आहे.

‘पार्टीक्युलेट मॅटर’चे प्रमाण क्षमतेपेक्षा अधिक

प्रदूषणाच्या मानकांमध्ये शहरात २.५ मायक्रोग्रॅम पार्टीक्युलेट मॅटरची २४ तासांची क्षमता ६० मायक्रोग्रॅम पर मीटर क्युब आहे.  दहा मायक्रोग्रॅम पार्टीक्युलेट मॅटरची २४ तासांची क्षमता १०० मायक्रोग्रॅम आहे. शहरात २.५ मायक्रोग्रॅम पार्टीक्युलेट मॅटरचे प्रमाण क्षमतेपेक्षा अधिक वाढले आहे.

संपूर्ण शहराची हवा प्रदूषित झाली आहे. हवेतील प्रदूषण दिसत नाही. मात्र, औष्णिक विद्युत केंद्रातून होणारे प्रदूषण शहरात सर्वत्र पसरत आहे. नीरीने याबाबतचा अभ्यास करून महापालिकेला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार काम करायला हवे.

– लीना बुद्धे, पर्यावरण अभ्यासक आणि संचालक, शाश्वत विकास केंद्र