वीज वापर एका मीटरमधून, देयकासाठी दुसरे

नागपूर : वीजचोरी थांबवण्यासाठी एसएनडीएलकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी  ग्राहकांकडून अनेक पर्याय शोधले जात आहेत. वीज वापर लपवण्यासाठी दोन मीटरचा वापर केला जात असून त्यातील एक अनधिकृत आहे. अनधिकृत मीटरचा वापर मीटर वाचनासाठी केला जातो.

शहरातील ७० टक्के भागातील सुमारे साडेपाच लाख ग्राहकांना एसएनडीएल तर इतर भागात महावितरणकडून वीजपुरवठा  होतो. एसएनडीएलकडे सिव्हिल लाईन्स, गांधीबाग, महाल हे तीन भाग तर महावितरणकडे काँग्रेसनगर आणि एमआयडीसी असे दोन भाग येतात. शहरातील वीज हानी कमी करण्यासाठी एसएनडीएलने गेल्या काही दिवसांपासून शहरात वीजचोरीच्या विरोधात कारवाई सुरू केली. त्यात काही ग्राहकांकडे एकाच प्रकारचे दोन मीटर आढळले आहे. एक अधिकृत  तर दुसरे नोंदणी नसलेले. ग्राहकाकडे मीटर वाचन करण्यासाठी कर्मचारी गेल्यास त्याला नोंदणी नसलेले मीटर दाखवले जाते. त्यात कमी वीज वापर दिसत असल्याने देयकही कमी रकमेचे येते. हा प्रकार एसएनडीएलच्या मानव नगरमधील एका ग्राहकाकडे निदर्शनात आला. येथे या ग्राहकाने गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल सहा लाख २१ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे पुढे आल्याने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली. तसेच या पद्धतीने शहरातील मोमिनपुरा, टेका नाका, सिद्धार्थनगर, लष्करीबाग, छोटा ताजबाग, शांतीनगर, स्विपर कॉलनीसह इतरही काही भागात मोठय़ा प्रमाणात वीजचोरी झाल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, एसएनडीएलच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर अशा पद्धतीच्या वीजचोऱ्या उघडकीस येत असल्याचे मान्य केले.

महावितरणच्या काळातील अनेक मीटर

महावितरणकडून स्पॅन्को  कंपनीला वीज वितरण करण्याची फ्रेंचायझी मे २०११ मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर स्पॅन्कोने  एसएनडीएल या कंपनीला दिली.  दरम्यान, उघडकीस आलेल्या  वीजचोरीत ग्राहकांकडील मीटर हे महावितरणच्या काळातील आहे, अशी माहिती आहे.

काही कंत्राटदार अडचणीत

फ्रेंचायझी भागातील विविध कामांची जबाबदारी असलेल्या काही कंत्राटदारांनी अनेक वर्षांपूर्वी  ग्राहकांचे वीज मीटर बदलले होते, परंतु त्यातील काहींच्या नोंदणी वीज कंपन्यांकडे देण्यात आल्या नव्हत्या.  काही कंत्राटदारांनी हे मीटर ग्राहकांना उपलब्ध केल्याचे तपासात पुढे आले आहे.