04 March 2021

News Flash

वर्तमानपत्रे जाहिरातींकरिता अधिकारी, व्यावसायिकांना धमकावतात – डॉ. रामभाऊ तुपकरी

स्वत:ला वेगळे दाखवण्याकरिता चुकीचे विश्लिेषण करून बातम्या छापल्या जातात.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. रामभाऊ तुपकरी

दैनिक स्वरूपाच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून येणाऱ्या सगळ्याच बातम्या पूर्णपणे सत्य नसतात, तर त्यातील काही मजकूर विशिष्ट हेतूने रंगवला जातो. काही वर्तमानपत्रांकडून जाहिरातींकरिता शासकीय अधिकारी व व्यावसायिकांना धमकावून पैशाची वसुली केली जाते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रामभाऊ तुपकरी यांनी व्यक्त केले. डॉ. हेडगेवार ज्ञानपीठ ज्ञानयोद्धा व्याख्यानमालेत ते बोलत होते.

जाहिरातींचे दर वाढवून मिळण्याकरिता काही वर्तमानपत्रे रोज ५० हजार प्रती निघत असल्या तरी कागदावर एक लाख दाखवतात. वर्तमानपत्रांनी स्वतला घालून दिलेल्या निकषानुसार त्यांच्या रोजच्या अंकात किमान ६० टक्के बातम्यांचा मजकूर तर ४० टक्के जाहिराती असायला हव्या. या जाहिरातींमुळेच त्यांचा रोजच्या अंकात वापरल्या जाणारा कागद व इतर खर्च पकडता १५ ते २० रुपयांचा हा वास्तविक अंक वाचकांना केवळ ४ ते ५ रुपयांत देता येतो. हा खर्च भरून काढण्याकरिता हल्ली वर्तमानपत्रांकडून विविध शासकीय अधिकारी, व्यावसायिकांना धमकावणे, त्यादृष्टीने विविध बातम्या छापून घेण्याचा अवैध प्रकार घडत असल्याचे डॉ. तुपकरी म्हणाले. या उद्योगांमुळेच विविध वर्तमानपत्रांत छापून येणाऱ्या सगळ्याच बातम्या १०० टक्के खऱ्या राहतील याची शाश्वती नाही. त्यामुळे बातम्या वाचताना वाचकांना त्यातील खरा गाभा समजण्याची गरज आहे. वर्तमानपत्रांमधील सगळ्याच बातम्या बोगस असतात, असे नाही. त्यातील प्रतिनिधींच्या नावानिशी येणाऱ्या, दिल्ली व मुंबईतील प्रतिनिधींकडून येणाऱ्या ९५ टक्के बातम्या योग्यही असतात. हल्ली शहरात टेबल न्यूजचा प्रकार बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये वाढला आहे. येथे संबंधित वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी कार्यालयात बसून मनात येईल त्या विषयावर विशिष्ट हेतूने लिहीताना आढळतात. त्यातून व्यावसायिक लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हल्ली वाढत्या स्पर्धेमुळेही एकच बातमी विविध बाजूने दाखवण्याचा प्रकार वाढला आहे.

स्वत:ला वेगळे दाखवण्याकरिता चुकीचे विश्लिेषण करून बातम्या छापल्या जातात. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या विश्वसनीयतेवरही प्रश्न उपस्थित झाला आहे. दूरचित्रवाणी स्वरूपातील प्रसारमाध्यमांमध्ये जास्तच स्पर्धा असून येथे विविध वाहिन्या बघितल्या तर एकच बातमी वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. त्यातच दिल्लीमध्ये हल्ली सरकारच्या बाजूने व विरोधात बातम्या दाखवणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांचे दोन गट दिसतात. त्यामुळे कोणत्या बातम्या खऱ्या समजाव्या हा प्रश्न नागरिकांना पडतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या काही क्षणाच्या भेटीबाबतही प्रसारमाध्यमांकडून उलट-सुलट बातम्या घेतल्या जातात. वास्तविक दोघांमधील संभाषण तिसऱ्याला माहीत नसते. परंतु त्यानंतरही सगळे आपापली मते वाचकांवर थोपत असल्याचे डॉ. तुपकरी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 4:58 am

Web Title: newspapers threaten officials industrialist for advertisements say dr rambhau tupkari
Next Stories
1 पाडगावकरांची काव्यसृष्टी ‘आनंदयात्री’तून उलगडली
2 कांदे, कोथिंबीर, मिरची, दूध रस्त्यावर
3 पक्षी संवर्धन, संरक्षणात लोकसहभाग महत्त्वाचा
Just Now!
X