’ सरसंघचालकांबरोबर दीड तास बंदद्वार चर्चा * भाजप कार्यकर्तेच नव्हे तर संरक्षण विभागही अनभिज्ञ

नागपूर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे सीमेवरील अनेक गावातील लोकांना इतरत्र हलवण्यात आले आहे. सीमेवरच्या या आणीबाणीच्या स्थितीने अवघा देश चिंतेत असतानाच्या पाश्र्वभूमीवर देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिर परिसरात भेट दिली. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासोबत जवळपास दीड तास बंदद्वार चर्चा केली. सीतारामन यांच्या या नागपूर दौऱ्याबाबत  कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. भाजपचे पदाधिकारी सोडाच, त्या ज्या खात्याचे नेतृत्व करतात त्या संरक्षण विभागालाही त्याची याबाबत काहीच माहिती नव्हती.

रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय संघ शिक्षा वर्ग सुरू आहे. त्यामुळे सरसंघचालकासह संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी शहरातच आहेत. दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास निर्मला सीतारामन यांचे विमानाने नागपूरला आगमन झाले. त्या थेट स्मृती मंदिर परिसरात पोहोचल्या व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांशी त्यांनी संवाद साधला. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी त्यांनी एक तास चर्चा केली. सीतारामन यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असली तरी संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ही भेट पूर्वनिर्धारित होती. संरक्षण विभागाचे काम सांभाळल्यानंतर त्या कार्यव्यस्ततेमुळे संघ मुख्यालयात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आज भेट दिली. यावेळी भय्याजी जोशी यांनी त्यांना स्मृतिचिन्ह भेट दिले. तीन तास स्मृती परिसरात घालवल्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्या  विमानतळाकडे रवाना झाल्या.