24 November 2020

News Flash

गडकरींचे खाते नागपुरात नापास, ‘एनएचएआय’चा वेगवान कामाचा दावा फोल!

बोखारा-नारा-पावनगाव आऊटर रिंग रोडचे काम ठप्प - भाग-१

बोखारा-नारा-पावनगाव आऊटर रिंग रोडचे काम ठप्प – भाग-१

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : गेल्या आर्थिक वर्षांत दरदिवशी सुमारे २५ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) खाते नागपुरात मात्र याकामी अपयशी ठरले आहे. नागपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या ६१ किलोमीटर आऊटर रिंग रोडचे बांधकाम दोन वर्षांहून अधिक कालावधी लोटला तरी अजून अर्धेही पूर्ण झालेले नाही.

नागपूर शहर भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी असल्याने कोलकाता, जबलपूर, हैदराबाद, छिंदवाडाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्ग शहरातून जातात. परिणामी शहरात वाहतूक कोंडी होते, अपघात घडतात आणि इंधनही वाया जाते. म्हणून प्रारंभी रिंग रोड बांधण्यात आले. पण, शहर वाढत गेल्याने आऊटर रिंग रोडची संकल्पना मांडण्यात आली. वेगवेगळ्या राज्यातून नागपुरात येणारे ट्रक शहराबाहेरूनच विनाअडथळा निघून जाण्यासाठी या रिंग रोडचा उपयोग होणार आहे. एनएच ७४, एनएच४७, एमएसएच३, एमएसएच४८, एमएसएच२५५, एमएच२६४ यांना तसेच प्रस्तावित समृद्धी महामार्गाला आऊटर रिंग जोडला जाणार आहे.  हा रस्ता चारपदरी व संपूर्णत सिमेंट काँक्रिटचा राहणार आहे. यासाठी एनएचएआय कंत्राटाराला ४० टक्के रक्कम देणार आहे. उर्वरित ६० टक्के रक्कम १५ वर्षांत तीन हप्त्यात दिली जाणार आहे. रस्त्याचा पहिला भाग बांधण्यासाठी ५३१ कोटी आणि दुसरा भाग बांधण्यासाठी ६३९ कोटी रुपये खर्च येणार आहे.

काम गतीने होण्यासाठी ६१ किमीचे दोन भाग करण्यात आले. मुंबईतील एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.ला मार्च २०१८ मध्ये काम मिळाले.

हे काम ३० महिन्यांत पूर्ण करायचे होते. परंतु एकही टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. पहिल्या टप्प्याचे काम ५२ टक्के झाले. कामाची गती अतिशय संथ आहे.  दुसऱ्या टप्प्याचे काम तर प्राथमिक अवस्थेतच आहे. दुसरा टप्पा फेटरी ते माहुरझरी, भरतवाडा ते चक्की खापा, बोखारा ते नारा, खसाळा ते मसाळा, खैरी ते पावनगाव ते धारगाव असा २८.०३५ किलोमीटरचा आहे.

यासंदर्भात एनएचएआयचे अधिकारी म्हणाले, कंत्राटदाराचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. पण, गेल्यावर्षीपर्यंत भूसंपादनाचा प्रश्न कायम होता. जमीन कंत्राटादाराच्या ताब्यात देण्यास विलंब झाल्याने बांधकाम पूर्ण करण्याची मुदत वाढवून दिली. त्यानंतर करोनामुळे मजुरांची समस्या निर्माण झाली. म्हणून पुन्हा दोन महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. तसेच वेळोवेळी कामाची गती वाढण्यासाठी पत्र व्यवहार सुरू आहे. दंडात्मक कारवाई देखील के ली आहे.

जागतिक मंदी आणि टाळेबंदीमुळे आऊटर रिंग रोडचे बांधकाम करीत असलेल्या एमईपी कंपनीला आर्थिक फटका बसल्याचे समजते. पण, आम्हाला काम तातडीने पूर्ण करून हवे आहे. म्हणून दोन महिन्यांची मुदतवाढीची नोटीस दिली आहे.

– एन.एल. यवतकर, प्रकल्प संचालक, एनएचएआय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 1:41 am

Web Title: nitin gadkari bokhara nara outer ring road work stalled zws 70
Next Stories
1 सणासुदीत नागपूरकरांची ऑनलाइन खरेदीला पसंती 
2 दोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली
3 ऑक्सफोर्डच्या लसीसाठी नागपुरात स्वयंसेवकांचे ‘स्क्रिनिंग’ सुरू
Just Now!
X