केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कबुली

महामार्गावरील टोल नाके बंद करण्याचे धोरण चुकीचे आहे. हे नाके बंद केल्याचा ताण सरकारी तिजोरीवर पडत आहे, असे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने अरुणाचलचे माजी राज्यपाल राम प्रधान यांच्या ‘माझी वाटचाल’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. याप्रसंगी गडकरी यांनी जोरदार फटकेबाजी केली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार गिरीश गांधी व्यासपीठावर होते.

विरोधी पक्षात असताना टोल नाके बंद करण्यासंदर्भात घेतलेली भूमिका चुकीची होती. परंतु उभ्या आयुष्यात सत्तेत येणार नाही याची खात्री असल्याने आम्ही विरोधात असताना अशी भूमिका घेत होतो. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना गोपीनाथ मुंडे आणि फडणवीस यांनी टोल नाके बंद करण्याची भूमिका घेतली. यामुळे राज्याची तिजोरी रिकामी होईल, असे सांगत होतो. त्यावर फडणवीस यांनी आपले सरकार थोडेच येणार आहे, असे उत्तर दिले होते. आता टोल नाके बंद झाल्याने राज्यावर प्रचंड ताण पडत आहे, असे गडकरी म्हणाले.